धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील मुरूमगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत येणार्या बेलगावमध्ये शनिवारच्या रात्री ९.४५ वाजता नक्षलवाद्यांनी ३८ वर्षीय बांधकाम कंत्राटदाराची गोळ्या घालून हत्या केली. छत्तीसगड-महाराष्टÑ सीमेच्या लगत असलेल्या राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या बेलगाव येथील जितेंद्र करवीरशहा मडावी (३८) बेलगाववरून मुरूमगावकडे दुचाकीने जात असताना गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या वळणावर जितेंद्र मडावी याला अडवून त्याची गोळ्या घालून हत्या केली. मडावी याचे प्रेत बेलगावच्या जिल्हा परिषद शाळेजवळ आणून टाकले. हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी पत्रके टाकली. या पत्रकात मृतक इसम काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता व पोलिसांचा खबर्या होता, अशी माहिती नमूद करण्यात आली आहे. जितेंद्र मडावी हा मागील चार-पाच वर्षांपासून बांधकाम कंत्राटाची छोटी-मोठी कामे करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी किरण, दोन मुली गरिमा व रिंकी, तीन भाऊ असा आप्त परिवार आहे. मृतक जितेंद्र मडावी मुरूमगाव जमिनदारीशी संबंधित राज परिवारातील आहे. ते महाराज म्हणून या परिसरात परिचित होते. त्यांचे पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याशी थेट संबंध होते व त्यांनी काही नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण करविण्यात भूमिका बजावली होती, असेही या चिठ्ठीत नक्षलवाद्यांनी लिहिले आहे. त्यांचा मृतदेह मुरूमगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन धानोरा येथे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेचा अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी महेश मांडवे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
बांधकाम कंत्राटदाराची नक्षलवाद्यांकडून हत्या
By admin | Updated: June 2, 2014 05:41 IST