मुंबई : भाजपा सरकार उद्योगपतींची बाजू घेणारे आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावत या सरकारने जाणीवपूर्वक उत्पादन खर्च सतत वाढत असतानाही ग्राहकांना खूश करण्यासाठी शेतमालाच्या किमती मुद्दाम कमी ठेवण्याचे काम केले आहे. यामुळे देशातील आणि राज्यातील शेती आणि शेतकरी भयंकर संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत केला. शेतमालाच्या किमती कोसळत असतानाही कच्चा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. यामागे भाजपाचे मोठे राजकारण आहे; पण या राजकारणात महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य देशोधडीला लागेल, असा इशाराही चव्हाण यांनी या वेळी दिला. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना चव्हाण यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. भाजपाच्या जाहीरनाम्यात या सरकारने कृषी उद्योग मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केली होती, राज्यात ५ हजार कृषी वसाहती उभ्या केल्या जातील असे सांगितले होते; पण त्यासाठी एक रुपयाची तरतूदही त्यांनी केलेली नाही, असे चव्हाण या वेळी म्हणाले. सरकारच्या निष्क्रियतेमुळे शेतमालाच्या किमती घसरल्या. कर्जमाफी न करण्याची घोषणा करत शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी टाकले. अजूनही शहाणपण सुचत असेल तर काही पावले उचला, असेही ते म्हणाले. सरकारला राज्यातील सगळी व्यवस्थाच मोडीत काढायची आहे असे दिसते आहे, यातून दिलासा मिळेल असे चित्र नाही, असे सांगून छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत सरकारच्या कारभारावर कसे ताशेरे ओढले आहेत हे दाखवून दिले. (विशेष प्रतिनिधी)
शेतमालाच्या किमती पाडण्याचे षड्यंत्र
By admin | Updated: July 24, 2015 01:53 IST