पालघर : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचा वेगळा कोटा द्यावा आणि निराधार प्रकरणासाठीची २१ हजार रुपये उत्पनाची अट रद्द करावी इ. मागणीसाठी बुधवारी पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.राज्य सरकारच्या विरोधात पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागामार्फत जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अध्यक्ष रामदास जाधव, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, मोहसीन शेख, निलेश राऊत, रोशन पाटील, शैलेश ठाकूर, सलीम पटेल, सुनील इंगोले इ. पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यावी, त्यांचे अनुदान ६०० रुपयांवरून २ हजार करण्यात यावे, राष्ट्रीय अर्थसाहाय्या साठी दारिद्रयरेषेची अट रद्द करून २० हजारांवरून अर्थसाहाय्य १ लाख करावे, लाभार्थ्यांना दारिद्रयरेषेखालील योजनेत समाविष्ट करावे, अनुदान वाटपादरम्यान अपंग लाभार्थ्यांना स्वतंत्र दिवस द्यावा, अण्णा भाऊ साठे, वसंतराव नाईक, महात्मा फुले, संत रोहिदास या मंडळाची कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, वर्षभर चलन भरूनसुद्धा रेशनकार्ड मिळत नसल्याने ते त्वरित द्यावे इ. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (वार्ताहर)
स्वस्त धान्यासाठी कॉँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:47 IST