सदानंद नाईक, उल्हासनगरमहापालिका स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक सोमवारी होणार असून महायुतीच्या मदतीला काँग्रेस धावल्याने सभापतीपदाची माळ जया माखिजा यांच्या गळ्यात पडणार आहे. महापौरपदाच्या निवडणुकीतही काँग्रेससह दोन नगरसेवक गैरहजर राहिल्याने युतीचा महापौर विजयी झाला होता. उल्हासनगर महापालिकेत महायुतीची सत्ता असून युतीच्या मदतीला सुरुवातीला साई तर आता काँग्रेस पक्ष धावत आल्याने युतीची सत्ता तरणार असल्याचे चित्र शहरात आहे. स्थायी समितीमध्ये सेनेचे- ४, भाजपाचे- ३, रिपाइचा- १, साई पक्षाचे- २, राष्ट्रवादी पक्षाचे- ४, काँग्रेस पक्षाचे- २ असे पक्षीय बलाबल आहे. सत्ताधारी युतीकडे- ९ तर विरोधी पक्षाकडे- ८ असे समसमान सदस्य आहेत.पालिका प्रभाग क्र.-४ समितीमध्ये सेना-भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक असताना सभापतीपदी काँग्रेसच्या मीना सोंडे बिनविरोध निवडून आल्या आहेत. याबदल्यात काँग्रेस पक्षाचे दोन स्थायी समिती सदस्य युतीच्या बाजूने नाहीतर गैरहजर राहणार आहेत. स्थायी समिती सभापतीपदासाठी युतीतील भाजपाच्या जया माखिजा, साई पक्षाचे महेश गावडे व राष्ट्रवादी पक्षाचे ओमी कलानी उभे ठाकले आहेत. ओमी कलानी ऐन वेळी उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.
उल्हासनगरमध्ये महायुतीला काँग्रेसचा टेकू
By admin | Updated: April 20, 2015 02:24 IST