ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १५- राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे जास्त जागांची मागणी करु अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. याबाबत शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे ज्येष्ठ नेते काँग्रससोबत चर्चा करतील असे मलिक यांनी स्पष्ट केले.
विधीमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी रविवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांची बैठक बोलवली होती. यात सुप्रिया सुळेंसह सर्व पदाधिकारी व मंत्री उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आघाडीबाबतचा निर्णय लवकर घेण्याची मागणी केली. तसेच बहुसंख्य आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. एलबीटीसारखे निर्णय होत नसल्याने अडचणी वाढतात असेही काही आमदारांनी निदर्शनास आणून दिल्याचे समजते.
या बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यात मलिक म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा हव्या असून तशी मागणीच काँग्रेसकडे केली जाईल. मराठा व मुस्लीम आरक्षण, एलबीटी याविषयांवर त्वरीत निर्णय घ्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करु असेही मलिक यांनी सांगितले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७० तर राष्ट्रवादी काँग्रेसने ११३ जागांवर निवडणूक लढवली होती.