मुंबई : काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक ६ नोव्हेंबरला येथील टिळक भवनात होणार असून, तीत विधानसभेतील गटनेत्याची निवड होईल. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता असल्याने नेता निवडीबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ४२ आमदार निवडून आलेले आहेत तर राष्ट्रवादीचे ४१. त्यामुळे ६३ आमदार असलेली शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर त्यानंतरचा मोठा पक्ष म्हणून काँग्रेसलाच विरोधी पक्षनेतेपद मिळावे, असा नेत्यांचा आग्रह आहे. गटनेता पदासाठी पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तरुणांमध्ये अमित देशमुख यांचा विचार होऊ शकतो. पण सरकारमध्ये असलेल्यांपैकी कोणालाही नेतेपद देऊ नये, अशी मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे ६ तारखेची बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)
काँग्रेसची गुरुवारी बैठक
By admin | Updated: November 5, 2014 04:31 IST