ऑनलाइन लोकमत
काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन
By admin | Updated: December 31, 2016 14:39 IST
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री एकनाथ उर्फ बाळासाहेब विखे पाटील यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले.
काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलीन
अहमदनगर, दि. 31 - कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील अनंतात विलिन झाले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास विशाल जनसमुदायाच्या उपस्थितीत आणि शोकाकुल वातावरणात प्रवरानगर येथे स्व. विखे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून आणि शोकधून वाजवून स्व. विखे यांना मानवंदना दिली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील (वय ८४)यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी प्रवरानगर येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
तेथे साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी मंत्री प्रकाश मेहता, गिरीश महाजन, संजय राठोड, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. स्नेहलता कोल्हे यांनीही अंत्यदर्शन घेतले. दुपारी बारा वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. दरम्यान काहीवेळ त्यांचे पार्थिव काहीवेळ त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले होते. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या पाठीमागे असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दुपारी बाराच्या सुमारास त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तेथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंत्यविधी संस्कार केले. त्यानंतर स्व. विखे यांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला.
यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून व शोकधून वाजवून स्व. विखे यांना मानवंदना दिली. यावेळी स्व. विखे यांच्या पत्नी सिंधुताई, पुत्र अशोक विखे, डॉ. राजेंद्र विखे, मुली नंदा, बेबी उर्फ शकुंतला, स्नुषा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, नातू डॉ. सुजय विखे यांच्यासह विखे परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रचंड जनसुमदायाने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. हजारो चाहत्यांनी लोकनेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. अनेकांना अश्रुंचा बांध फुटला. लोकनेत्याच्या आठवणींनी वातावरण शोकमग्न झाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, आ. शरण रणपिसे, आ. डी. पी. सावंत, संजय दत्त, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, स्थानिका स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहनप्रकाश यांनीही यावेळी स्व. विखे यांना श्रद्धांजली वाहिली. विखे हे शेतकऱ्यांचा आवाज होते. परखड व्यक्तिमत्त्वाचा नेता गमावला, अशा शब्दात मोहन प्रकाश यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.