ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - राज्यात १५ वर्षापासून काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात असलेल्या आघाडीचाही आज घटस्फोट झाला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज राष्ट्रवादीने केली. काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीची ताकद असतानाही कमी जागा देवू केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना - भाजपा युती तुटल्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्यात असलेली आघाडी संपुष्टात आल्याने आता निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीत प्रबळ पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असून राज्यात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. २००९ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला ७१ जागा तर काँग्रेसला ६९ जागा मिळून सुध्दा राष्ट्रवादीने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्यास कमीपणा मानला नाही. असे असताना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्याने काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला कमी जागा देवू केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.