मुंबई : एकीकडे आघाडीत जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या झडत असतानाच काँग्रेसने मात्र थेट प्रचार मोहिमेची आघाडी उघडली आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हुतात्मा चौकात शहिदांना अभिवादन करून सोमवारी सकाळी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेला सुरुवात होईल. यावेळी प्रचार ज्योतीचे प्रज्वलन करण्यात येणार आहे. तेथून ही ज्योत आझाद मैदानात आणून त्याची महाज्योत पेटविण्यात येणार आहे. या महाज्योतीतून राज्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक ५४ जिल्ह्यांसाठी ५४ ज्योती प्रज्वलित केल्या जाणार असून, त्या संबंधित जिल्ह्यांमध्ये नेऊन तेथेही प्रचार मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, समन्वय समितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, प्रचार समितीचे अध्यक्ष नारायण राणे, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदूरकर आदी नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर गांधी भवन येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांची बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचा आज होणार शुभारंभ
By admin | Updated: September 1, 2014 04:09 IST