मुंबई : ऊर्जेची बचत करणाऱ्या रहिवासी इमारती, उद्योग आणि वाणिज्यिक संकुलांना काही सवलती देण्याचे सुतोवाच नवीन ऊर्जा संवर्धन धोरणात केले आहे. ‘महाऊर्जा’च्या संकेतस्थळावर या धोरणाचा मसुदा उपलब्ध केला असून त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्य शासनाने २००१ मध्येच ऊर्जा संवर्धन कायदा केला होता पण त्या अंतर्गत ऊर्जा संवर्धनाचे धोरणच तयार झाले नाही. आता ते तयार करण्याची जबाबदारी ‘महाऊर्जा’ कडे देण्यात आली आहे. या धोरणांतर्गत विविध उपाययोजनांद्वारे २०२०-२१ पर्यंत एक हजार मेगावॅट विजेची बचत करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. नवीन धोरणानुसार वीज, आॅईल, गॅस बचतीद्वारे शासनावरील अनुदानाचा बोजा कमी करणे, ऊर्जा बचतीचे/ऊर्जा कार्यक्षमतेचे तंत्रज्ञान वापरास प्रोत्साहन देणे, एलईडीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन, ग्रामपंचायती, नगरपालिका/महापालिकांमध्ये पथदिवे म्हणून एलईडीचा वापर यावर भर देण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांत वीजबचत करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)
ऊर्जाबचत करणाऱ्या इमारतींना सवलती!
By admin | Updated: August 24, 2016 05:02 IST