सांगली : जिल्ह्यात शनिवारपासून पावसाने मुक्काम ठोकल्याने तासगाव, कवठेमहांकाळ तसेच मिरज पूर्व भागातील द्राक्षबागातदार शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटले आहेत. बागा वाचविण्यासाठी औषध फवारणी सुरू झाली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. तासगाव : तासगाव तालुक्यात रविवारीही पावसाचा मुक्काम राहिल्याने द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत. ढगाळ वातावरण कायम असल्याने द्राक्षबागायतदारांची बागा वाचविण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. शुक्रवार, दि. २४ आॅक्टोबरपासून हवामानात बदल झाला. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाची रिपरिपही सुरू होती. रात्रभर पाऊस बरसत होता. आज सकाळीही पाऊस झाला. सकाळी ९ वाजल्यानंतर हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी ढगांची दाटी कायम आहे. त्यामुळे चिंताग्रस्त असणाऱ्या द्राक्षबागायतदारांची उपाययोजनांसाठी धावपळ सुरू झाली आहे. आगाप छाटण्या घेतलेल्यांसाठी हा पाऊस जास्त नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षबागायतदारांची खरोखरच झोप उडाली आहे. उशिरा छाटणी घेतलेल्या बागांमध्ये सध्या तरी नुकसानकारक स्थिती नाही; मात्र फुलोऱ्यातील बागांना तडाखा बसू शकतो.नवीन आलेले अंकुर मोडणे, तयार होत असलेले द्राक्षांचे घड गळून पडणे, घडात पाणी साचून कूज होणे अशा वेगवेगळ्या संकटांशी बागायतदाराला सामना करावा लागत आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषध फवारणी सुरू ठेवले जात आहेत. दावण्याचा प्रादुर्भाव रोखणे हे सध्या बागायतदारांपुढचे आव्हान आहे. सध्या कमी प्रमाणात दावण्याचा प्रादुर्भाव असला तरी, वातावरण दावण्यासाठी अनुकूल झाले आहे. पावसाची आधी कल्पना येत असल्यामुळे बागायतदारही आता तयारीत असतात. औषधांच्या मात्रांचे वेळापत्रकही त्यांच्याकडे तयार आहे. सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेत उभारता येत नाही, परंतु औषधांच्या मात्रा दिल्याशिवाय पर्यायही नाही. ट्रॅक्टरवर युनिट करून फवारणी करणे सोपे जात असले तरी, लहान बागायतदाराला पंपाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांची मोठी कसरत होत आहे. (वार्ताहर)सोनी परिसरात धावपळसोनी : अवकाळी पावसाने द्राक्षबागायतदारांचे धाबे दणाणले असून, ऐन दिवाळीमध्ये द्राक्षबागायतदारांचे दिवाळे काढले आहे. दावण्या रोगाच्या प्रादुर्भावासह फुलोऱ्यामध्ये असलेल्या द्राक्षबागांना फळ कुज होण्याची भीती असल्याने शेतकरी औषधांची फवारणी करून बागा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगले हवामान राहील या आशेने शेतकऱ्यांनी एक महिना छाटणी उशिरा केली आहे. कवठेमहांकाळ पश्चिममध्ये बागांना फटकाशिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील पश्चिम भागातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी ढगाळ वातावरण असल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी दावण्या व बुरशी आदी रोगांवर मात करण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हजारो रुपयांची औषध फवारणी केली, मात्र थोड्याच वेळात पावसाने सुरुवात केल्याने बागेला फवारलेली आषैधे पूर्णपणे पाण्यात वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बोरगाव, मळणगाव, शिरढोण, देशिंग, जायगव्हाण आदी या पश्चिम भागातील गावात द्राक्षक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या भागात सुमारे ६0 टक्के शेतकऱ्यांनी आॅक्टोबरमध्ये छाटण्या केल्या. सुमारे ४0 टक्के छाटण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच उशिरा असणाऱ्या छाटण्या सुरुवातीला फुलोरा अवस्था असते. यामध्ये पाणी शिरल्यावर झाडावर घड कुजण्यास सुरुवात, तर पाकळ््या कुजणे तसेच दावण्या आदी प्रकार होत आहेत.जर पाऊस अथवा ढगाळ वातावरण कायमस्वरुपी राहिल्यास शेतकऱ्यांचे पन्नास टक्के उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोरगाव येथील सुमारे २00 एकर द्राक्षक्षेत्र मळणगाव येथी सुमारे ४00 एकर, तर देशिंग येथे सुमारे ३00 तसेच तालुक्यामध्ये सुमारे १२00 हेक्टर क्षेत्र हे द्राक्ष बागेचे आहे. औषधाचा दर्जा योग्य नाही. त्यातील साधा घटक तपासण्यासाठी सुमारे पाच हजार खर्च येतो. हा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. तसेच अनेक एजंट शेतकऱ्यांकडे बागेची लागणारी औषधे खपवत आहेत. परंतु योग्य त्या औषधांचा वापर व नामांकित कंपन्यांची औषधे वापरणे योग्य आहे.- दत्ताजीराव शिंदेप्रगतशील शेतकरी, मळणगाव (ता. कवठेमहांकाळ)द्राक्ष, सोयाबीन, भुईमूग पिकांचे नुकसान शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, भुईमूग व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. हायब्रीड ज्वारीचेही नुकसान झाले आहे. शिराळा तालुक्यातील भात पिकालाही पावसाचा फटका बसला आहे. झेंडूचेही नुकसान झाले आहे. हरभरा, शाळू पिकांच्या लागवडीसाठी ओल निर्माण झाल्याने या पावसाचा फायदा होणार आहे. कवठेएकंद परिसरातही धावाधावकवठेएकंद : कवठेएकंद, कुमठे, नागाव-कवठे, उपळावीसह परिसरात अवेळी होत असलेल्या पावसामुळे नगदी पीक म्हणून ओळखलेल्या द्राक्ष पिकावर मोठे संकट ओढावले आहे. पावसाच्या संततधारेबरोबर उन्हाचा तडाखा अशा विरोधाच्या वातावरणामुळे द्राक्ष वेलीवरील करपा, दावण्या अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ढगाळ, दमट हवामानामुळे रोगांचा जोर वाढल्यामुळे वेलीवरील रोग आटोक्यात आणण्यासाठी औषध फवारणी करावी लागत आहे. महागडी औषधे, मजुरीतील दरवाढ वेळेत फवारणी करायची असल्यामुळे जादा पैसे खर्चून औषधांची फवारणी केल्याने नेहमीपेक्षा अधिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात नाही आला तर, बागा सोडून देण्याचाही धोका निर्माण होणार आहे. गेल्या चोवीस तासातील पाऊस (मिलिमीटरमध्ये)मिरज : १८ तासगाव : ८. ५ कवठेमहांकाळ : १५.६ जत : १७ कडेगाव : ४.८ विटा : ७.८ पलूस : १५.८आटपाडी : ४ इस्लामपूर : ८.९ शिराळा : १६.५ संततधार पावसाने जनजीवन विस्काळीत झाले आहे. सांगलीतील गुंठेवारी भागात दैना उडाली आहे. येथील शामरावनगर, हरिपूर रस्त्यावरील काळी वाट, संजयनगर, शिंदे मळा, हनुमाननगर आदी गुंठेवारी भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. रहिवाशांना आपली दुचाकी रस्त्याकडेला पार्क करुन घरी जावे लागत आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, शिवाजी स्टेडियम, तरुण भारत स्टेडियम आदी क्रीडांगणांमध्ये पाणी साचून राहिले आहे. आंबेडकर स्टेडियममध्ये महिन्याभरपाणी साचून असल्यामुळे खेळाडूंची अडचण झाली आहे.
द्राक्षबागायतदारांवर चिंतेचे ढग...
By admin | Updated: October 26, 2014 23:10 IST