योगेश पांडे - नागपूर
मुस्लीम धर्मात महिलांच्या बुरख्याला (हिजाब) एक महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक भावनेशी जुळलेला बुरखा घालून येण्यास राज्यातील काही महाविद्यालयांनी बंदी घातल्याचे समोर आले होते. ही बाब राज्य शासनाने गंभीरतेने घेतली आहे. शाळा व महाविद्यालयांच्या आवारामध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना बुरखा घालून येण्यास बंदी घालणो अयोग्य आहे व अशा प्रकारचे आदेश महाविद्यालयांनी देऊ नये, अशा आशयाचे परिपत्रक डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनने (डीटीई) काढले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशांनंतर परिपत्रक सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.
राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा कालावधीत मुस्लीम विद्यार्थिनींना बुरखा घालण्याबाबत बंदी घालण्यात आल्याच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्येदेखील असे प्रकार सुरू असल्याची तक्रार ‘मुव्हमेन्ट फॉर वुमन वेल्फेअर’ या संस्थेने केली होती. याची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्रलयाने संबंधित महाविद्यालयांना चांगलेच फटकारले. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासंदर्भात विभागाने विस्तृत निर्देशच काढले आहेत. मुंबईतील काही महाविद्यालयांमध्ये झालेल्या घटनांमुळे सामाजिक समतोल बिघडण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही धर्माशी संबंधित असलेले संवेदनशील आदेश काढताना महाविद्यालयांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात आले. या निर्देशांच्या आधारावर यासंबंधात ‘डीटीई’ने सर्व पदवी, पदविका महाविद्यालयांच्या प्राचार्यासाठी परिपत्रक काढले आहे.
सामाजिक समता जपणो आवश्यक
बुरख्यावर महाविद्यालय परिसरात बंदी लावण्याचे प्रकार घडले ही बाब खेदनजक आहे. सामाजिक समता जपणो हे आवश्यकच आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रलयाने संबंधित निर्देश दिले आहेत. शिवाय ‘डीटीई’च्या कक्षेअंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांना याची सूचना देण्यासदेखील सांगितले. त्यानुसार आम्ही परिपत्रक काढले आह़े, अशी माहिती डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिली.