बाबूराव चव्हाण /उस्मानाबादभूम तालुक्यातील वांगी येथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीचा निर्धार करून ‘घर तेथे नारळाचे झाड’ ही संकल्पना सत्यात उतरविली. ग्रामस्थांनी या उपक्रमाला खंड पडू न दिल्याने गावातील वृक्षांची संख्या आता कुटुंबसंख्येच्या तिप्पट झाली आहे. त्यामुळे ४११ कुटुंबसंख्या असलेल्या या गावाने अक्षरश: हिरवा शालू पांघरला आहे. भूम शहरापासून अवघ्या वीस किमी अंतरावर वांगी हे गाव आहे. गावाची लोकसंख्या सव्वादोन हजाराच्या घरात आहे. साधारपणे साडेतीन वर्षांपूर्वी गावामध्ये फारसे वृक्ष नसल्याने गावाला एकप्रकारे उजाड स्वरूप आले होते. हे चित्र बदलण्याचा निर्धार वांगी ग्रामपंचायतीने केला. प्रत्येक घरासमोर नारळाचे झाड लावण्याचा निर्णय घेऊन युद्धपातळीवर अंमलबजावणीही केली. कुठलेही अनुदान अथवा मदतीची अपेक्षा न करता ग्रामस्थांनी आपापल्या घरासमोर नारळाची झाडे लावली आणि ती जोपासलीही. एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांनी गावाकडे येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निश्चय केला आणि तो प्रत्यक्षातही उतरविला. रस्त्याच्या दुतर्फा विविध फळे, फुले आणि शोभेच्या झाडांची लागवड केली. घरासमोर लावलेल्या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी त्या-त्या कुटुंबांनी उचलली. परंतु, रस्त्यांच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना पाणी कोण घालणार, असा प्रश्न जेव्हा निर्माण झाल्यानंतर ग्रामपंचायतीने पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती अवलंबिली. तसेच झाडांच्या संरक्षणासाठी ‘ट्री गार्ड’ बसविले असून आज जवळपास सर्वच रस्ते गर्द झाडीने नटले आहेत. त्यामुळे पूर्वी भकास दिसणारे गाव आज अक्षरश: झाडांच्या गर्तेत हरवून गेले आहे. विविध पुरस्कारांवर कोरले नावरस्ते, सांडपाण्याचे व्यवस्थापन, नाल्या-शौचालयाचे बांधकाम आदी कामांच्या जोरावरच ग्रामपंचायतीने विविध पुरस्कारांवर नाव कोरले आहे. २०११-१२मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. पर्यावरण संतुलित ग्राम योजनेअंतर्गत सलग तीन वर्ष हे गाव पात्र ठरले. निर्मल ग्राम पुरस्कारही पटकाविला. एवढेच नाहीतर, ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकनही मिळाले आहे. सौरऊर्जेने उजळले गाव विद्युत भारनियमन आणि वीजबिलांच्या कटकटीतून सुटका व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने सौरऊर्जेची कास धरली आहे. गावांतील प्रमुख रस्ते, चौक, मंदिर परिसर, ग्रामपंचायत प्रांगण आदी ठिकाणी सौरदिवे बसविण्यात आले आहेत. येणाऱ्या काळातही सौरऊर्जेचा अधिकाअधिक वापर वाढविणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
‘घर तेथे नारळाचे झाड’!
By admin | Updated: April 10, 2017 03:23 IST