मुंबई : मुंबईतील जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा स्वतंत्रपणे विकास करण्यास बिल्डर पुढे येत नसल्याने अखेर शहराकरिता समूह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी घेतला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागणार असे चित्र असताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना ही भेट दिली.क्लस्टर डेव्हलपमेंटची ही योजना तूर्त मुंबई शहरासाठी (सायन-माहीम ते कुलाबा) या भागासाठी लागू होणार आहे. उपनगरासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करण्याचा निर्णय न्यायालयात या प्रकरणी दाखल असलेल्या जनहित याचिकेच्या निकालानंतर घेण्यात येईल. त्याचवेळी न्यायालयात झालेल्या प्रकरणात ही योजना लागू करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा अभ्यास करण्याची सूचना करण्यात आली होती. क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेमुळे लोकसंख्येत दुप्पट वाढ होईल, त्यामुळे रस्ते, शाळा, बाजारपेठा, उद्याने आदी नागरी सुविधांवर ताण पडणार असून, शहराचा नियोजित विकास साधणे अडचणीचे होणार असल्याचा एक आक्षेप आहे. मुंबई शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये चटई क्षेत्र निर्देशांक व आवश्यक पायाभूत सुविधा यांचा अभ्यास करण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत क्लस्टर, ठाण्यात एसआरए
By admin | Updated: September 10, 2014 03:43 IST