पुणे : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कृषिमालाच्या विक्रीमुल्यावर शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत बंद करण्याचा निर्णय पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी शुक्रवारी घेतला. आडतदारांनी शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून आडत कपात करावी, असे डॉ. माने यांनी स्पष्ट केले आहे. रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.पणन संचालक डॉ. माने यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र आडत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. बाजार समितीत शेतकऱ्यांकडून आडतदारांकडे माल आणला जातो. या मालाची विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पट्टीतून आडत कपात केली जात होती. आता शेतकऱ्यांच्या पट्टीतून आडत कपात न करण्याचे आदेश डॉ. माने यांनी दिले आहे. याऐवजी आडतदारांनी खरेदीदाराकडून एक टक्के आडत कपात करावी, असा पर्याय डॉ. माने यांनी दिला आहे. कृषि मालाच्या खरेदी विक्री व्यवहारात आडते, दलाल यांनी सर्व प्रकारच्या कृषि मालाच्या (भुसार (बिगर नाशवंत), नाशवंत) विक्रीमुल्यावर शेतकऱ्यांकडून आडत कपात करण्यात येऊ नये, असे आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)व्यापारी करणार २४ पासून बेमुदत बंद अडत बंद करण्याची घोषणा केल्याचे तिव्र पडसाद मुंबई बाजारसमितीमध्ये उमटले आहेत. येथील व्यापाऱ्यांनी या निर्णयास विरोध करून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. फळ मार्केटमधील माजी संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे बाजारसमित्यांत व्यापार करणे अशक्य होईल. यास मुंबईतील सर्व व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचे ठरविले आहे. यासाठी सर्वांना विश्वासात घेवून २४ व २५ डिसेंबरला मार्केट बंदचा विचार केला जात आहे.
राज्यात आजपासून आडत बंद
By admin | Updated: December 21, 2014 01:32 IST