कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले होते, पण त्यांनी ‘शब्द’ पाळलेला नाही. आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा साखरेचे दर कोसळल्याने कारखानदार अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने ३१ रुपये प्रतिकिलो साखरेचा बाजारातील भाव गृहीत धरून एफआरपी काढली आहे. पण सध्या साखरेचे दर २१ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कारखाने यंदा ३० ते ४० कोटींनी तोट्यात आहेत. आगामी हंगामासाठी कोणतीही बँक त्यांना कर्ज देणार नाही. जिल्ह्णातील कारखान्यांनी केवळ एफआरपीप्रमाणे पैसे दिले आहेत, उर्वरित ठिकाणी १५०० ते १९०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. त्यामुळे हे कारखाने फारसे अडचणीत नाहीत पण जिल्ह्णातील कारखाने व शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत कारखान्यांना दोन हजार कोटी पॅकेजची घोषणा केली होती पण ही घोषणा हवेतच विरली आहे. याविरोधात आगामी अधिवेशनात दोघांवर हक्कभंग दाखल करून विधानसभा बंद पाडू, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला. ३१ मेपूर्वी दोन हजार कोटींचे पॅकेज कारखान्यांना दिले नाही तर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. ६ जूनला पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी शनिवारी (दि. ३०) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात दुपारी ४ वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)विनय कोरे यांच्याशी आज चर्चा बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी -जनसुराज्य पक्षाची आघाडी आहे. याही निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. ३०) रात्री आठ वाजता शासकीय विश्रामगृह येथे माजी मंत्री विनय कोरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग दाखल करणार
By admin | Updated: May 30, 2015 01:02 IST