वर्धा : मापात गडबड पेट्रोलपंपाविरोधात वध्यार्तील नागरिकांचा संताप मंगळवारी अनावर झाला. शंभर रुपयांत टाकभर पेट्रोल मिळाल्याचे एका ग्राहकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने या फसवणुकीविरोधात जाब विचारल्यानंतर एक-एक करीत शेकडो नागरिक जमी झाले आणि त्यांनी पेट्रोलपंप मालकाला सुमारे तीन तास घेराव घातला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कौशल्याने परिस्थिती हाताळल्याने अनुचित प्रकार घडला नाही.शहराच्या मध्यभागी असलेल्या पेट्रोलपंपवर हा प्रकार घडला. किशोर देशमुख यांनी १०० रुपयांचे पेट्रोल गाडीत टाकायला सांगितले. पेट्रोल टाकल्यानंतर त्यांना पेट्रोल कमी टाकल्याचा संशय आला. त्यांनी पाण्याची बाटली खरेदी करून त्यात पेट्रोल भरले असता ते अतिशय कमी असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने उद्धटपणे उत्तरे दिली. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. पेट्रोल कमी देण्याचा हा प्रकार नेहमीचाच असल्याने काही वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांनी पेट्रोलपंपाकडे धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. बघता बघता शेकडोंचा संतप्त जमाव पेट्रोलपंपावर जमा झाला. लोकांचा अनावर झालेला संताप पाहून खबरदारीचा उपाय म्हणून दंगानियंत्रण पथक व मार्शल पथकाला पाचारण करण्यात आले होते. नायब तहसीलदार जी.सी. बर्वे व पुरवठा निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन लेखी स्वरूपात तक्रार लिहून घेतली. यावेळी वजनमाप विभागाला पाचारण करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
पेट्रोलपंपाविरोधात नागरिकांचा उद्रेक
By admin | Updated: August 17, 2016 04:47 IST