कमलाकर कांबळे, नवी मुंबईखारघर येथील ‘स्वप्नपूर्ती’ प्रकल्पातील घरांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर येत्या काळात अल्प उत्पन्न घटकांसाठी आणखी १० हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या प्रस्तावित गृहप्रकल्पांतील घरे स्वस्त दरात उपलब्ध करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यासाठी वाढीव चटई निर्देशांक मिळावा, या दृष्टीने राज्याच्या नगरविकास विभागाकडे सिडकोने पाठपुरावा सुरू केला आहे.सिडकोने मागील तीन वर्षांत शहरात विविध घटकांसाठी पावणेनऊ हजार घरे बांधली आहेत. त्यापैकी अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी साडेचार हजार घरे आहेत. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी खारघरमध्ये उभारण्यात येत असलेल्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील इमारतींची उंची ७ ते १४ मजल्यांपर्यंत आहे. नियमानुसार या प्रकल्पासाठी दीड एफएसआय वापरण्यात आला आहे. प्रस्तावित प्रकल्पांसाठी मागणी केल्यानुसार तीन चटईक्षेत्र मंजूर झाल्यास या इमारतींची उंची २० ते २५ मजल्यांपर्यंत वाढविणे शक्य होणार आहे. असे असले तरी अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना अशा टॉवरमध्ये घरे देणे सयुक्तिक ठरणारे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी नियमानुसार दीड चटईक्षेत्राच्या माध्यमातून ७ व १४ मजल्यांच्याच इमारती बांधल्या जातील. हे गृहप्रकल्प उभारल्यानंतर उरलेला दीड एफएसआय मोकळ्या भूखंडांना लागू करून त्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीतून अल्प उत्पन्न घटकांसाठी दर्जेदार व स्वस्त घरे उपलब्ध करता येणे शक्य असल्याचे मत भाटिया यांनी व्यक्त केले आहे.इथे बांधणार घरेघणसोली, वाशी, खारघर व तळोजा - पाचनंद या ठिकाणी ही घरे बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ग्राहकांना ही घरे स्वस्तात उपलब्ध व्हावीत, असा सिडकोचा प्रयत्न असणार आहे. प्रस्तावित गृहप्रकल्पांसाठी तीन चटई निर्देशांक मिळावा, अशी सिडकोची मागणी आहे. त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा सुरू असून, नगरविकास खात्याशी चर्चा झाल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी सांगितले.
सिडकोची लवकरच १० हजार घरे
By admin | Updated: December 1, 2014 02:24 IST