आळंदी : अनधिकृत बांधकाम प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे राहुल चिताळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांचे नगरसेवकपद रद्द होण्यासाठी अपील केले होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन राहुल चिताळकर यांचे नगरसेवकपद रद्द केले, तर प्रशांत कुऱ्हाडे यांच्याविरोधात पुरावा नसल्याने पद कायम ठेवण्याचा निर्णय ३० नोव्हेंबरच्या आदेशान्वये दिला होता. या निर्णयाविरोधात राहुल चिताळकर यांनी व्यथित होऊन पुणे विभागीय आयुक्तांकडे ८ डिसेंबरला अपील दाखल केले होते.यामध्ये चिताळकर यांनी, आपण कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही, तसेच अनधिकृत बांधकामावर प्रशासनाने केलेल्या कारवाईत अडथळा आणला नसल्याचे अपिलात म्हटले. मात्र, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी दिलेला आदेश कायम असल्याबाबतचे पत्र विभागीय आयुक्तांना सुनावणीदरम्यान दिले. जिल्हाधिकारी आणि रमेश थोरात यांच्या टिपणीचा संदर्भ घेऊन विभागिय आयुक्तांनी चिताळकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. प्रशांत कुऱ्हाडे यांनी इंद्रायणीकाठी अनधिकृतपणे बांधलेल्या गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते. यामुळे अनधिकृत बांधकामास प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचे अपिलात सिद्ध झाले. तरीही, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देताना कुऱ्हाडे यांचे पद रद्द ठरविले नाही, ही विसंगती असल्याचे विभागीय आयुक्तांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर, कुऱ्हाडे यांच्या बाबतीत सविस्तर फेरचौकशी करून निर्णय घेण्यासाठी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे परत पाठविण्याबाबतचा आदेश विभागिय आयुक्तांनी दिला.(वार्ताहर)
चिताळकर यांचे नगरसेवकपद रद्दचा निर्णय कायम
By admin | Updated: May 21, 2016 01:27 IST