मुंबई : चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला सोमवारी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच जागेच्या मालकाला गुन्ह्यात सहभागी असल्याबद्दल तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.घटनेदरम्यान, मुलीच्या घराशेजारी होर्डिंग तयार करण्यात येत असलेल्या गाळ्यात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापल्याची बातमी मुलीच्या वडिलांच्या कानावर आली. गाळ्यात काम करणाऱ्या नाझीर खान याने तो मृतदेह नष्ट केल्याची शेजाऱ्यामध्ये चर्चा सुरू होती. याची माहिती मुलीच्या वडिलांनी पोलीसांना दिली. मात्र मुलीचे वडील पोलीस तपासावर समाधानी नव्हते. त्यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.उच्च न्यायालयाने त्या झोनमधील सहाय्यक पोलीस आयुक्तांना याप्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला. पुन्हा एकदा मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली, अशी माहिती दुसऱ्या शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाली.याप्रकरणी पोलिसांनी नाझीर खान आणि गाळ्याचा मालक विनदि मेहेर यांना अटक केली. नाझीरच्या वकिलाने आपल्या अशीलाला नाहक या केसमध्ये गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद केला. विनोदच्या वकिलांनी त्यादिवशी विनोद त्याठिकाणी नव्हता असे न्यायालयाला सांगितले. मात्र न्यायालयाने सरकारी वकिलांनी रेकॉर्डवर सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांची दखल घेत नाझीरला चार वर्षीय मुलीचे अपहरण करून तिचा बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावली. तर विनोदविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने त्याने गुन्ह्यात नाझीरची मदत करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी) विलेपार्ल्यात सापडला होता मृतदेह१ जानेवारी २०१२ रोजी साकीनाका येथे राहणारी चार वर्षांची चिमुरडी घराबाहेर खेळायला गेली होती. दुपारी खेळायला गेलेली मुलगी बराच वेळ उलटून गेला तरी घरी न आल्याने तिच्या वडिलांनी साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी मुलीच्या वडिलांना पोलीस ठाण्यामधून फोन आला. विलेपार्ले येथे एका मुलीचा मृतदेह सापडला असून तो ओळखण्यासाठी कूपर रुग्णालयात यावे, असे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना सांगितले. तो मृतदेह त्या मुलीचाच होता.
चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्याला फाशी
By admin | Updated: March 29, 2016 01:53 IST