शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

चिंब पावसानं रान झालं आबादानी...

By admin | Updated: August 19, 2015 22:23 IST

कारण-राजकारण

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून महाराष्ट्रप्रांती वाद पेटला असताना सांगलीत मात्र राजकारणाच्या श्रावणधारा कोसळू लागल्यात. प्रत्यक्षात आभाळातून पाण्याचा टिपूसही येत नाहीय, पण अखंड जिल्हा राजकीय सरींमुळं चिंब भिजायला लागलाय.सांगलीच्या बाजार समितीत ‘पतंग’ नक्षत्रानं रात्रीत पाऊस पाडल्यानं काँग्रेसच्या पॅनेलवर मतांचा वर्षाव झाला. परिणामी ‘पतंग’ नक्षत्राच्या आशा पल्लवीत झाल्या. जिल्हाभरातलं रान आता आपलंच म्हणून या नक्षत्रानं पुढचं ‘टार्गेट’ खानापूर-विटा असल्याचं सांगून टाकलं. त्यामुळं टोपी आणि गोपी दोघंही बुचकळ्यात पडले. ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा...’ अशी हाक देणाऱ्या या दोघांनाही आता ‘पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा’ असं म्हणावं लागतंय. खानापूरच्या बाजार समितीत मोहनशेठ-अनिलभाऊंची सर धावून आल्यानं टोपीचं मडकं वाहून गेलं, तर आटपाडीत राजेंद्रअण्णांच्या लाटेत गोपी भुईसपाट झाला. संजयकाकांची प्रेमळ रिमझिम अंगावर झेलल्याचा हा परिणाम! एवढं होऊनही गोपी म्हणतोय,सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय,काकांमुळं एखादं महामंडळ मिळेल काय?दुसरीकडं ‘पतंग’ नक्षत्राच्या भयानं टोपीही हलायला लागलीय. विटा नगरपालिकेत या नक्षत्राचा कोप झाला तर काय, या भीतीनं टोपीखाली सुरू असलेली कुजबूज ऐकायला मिळतेय, ती अशी : सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय,पतंगाची दोरी विट्यात तरी कटेल काय? तिकडं पार पूर्वेला जतमध्ये पावसाचा थेंब नाही, पण जगतापसाहेब आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा झिम्माड पाऊस कोसळू लागलाय. ‘पतंग’ नक्षत्राच्या पावसामुळं सावंत कंपनी-शिंदे सावकारांचा हुरूप वाढलाय. जतमध्ये म्हैसाळ योजनेच्या पाण्याला भरती आल्याची स्वप्नं त्यांना भरदिवसा पडू लागलीत.श्रावणात घन निळा बरसला...हे मंगेश पाडगावकरांचं गाणं गुणगुणत ते ‘पतंग’ नक्षत्राभोवती फेर धरू लागलेत. या नक्षत्रानं असंच कायम बरसावं, यासाठी त्यांनी जगतापसाहेबांवर आरोपांच्या कृत्रिम पावसाची रॉकेट सोडायला सुरुवात केलीय. त्यामुळं जगतापांचे सवंगडी,ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना...असा सूर आळवत तालुक्याला साद घालताहेत. (अर्थात जतचा पाऊस असा थोडाच येतोय! ‘जयंत नक्षत्र’ही तिथं कुचकामी ठरतंय.)शेजारच्या कवठेमहांकाळमध्ये आबांच्या गटाला नेतृत्वाच्या दुष्काळी झळा जाणवताहेत. कुठल्या कृत्रिम नक्षत्रावर नव्हे तर मनगटाच्या जोरावर पाऊस पाडणारी ही माणसं. सांगली बाजार समितीत त्यांनी तिथं आयात केलेलं ‘सुरेशभाऊ नक्षत्र’ बाद ठरवत ‘जयंत-काका’ नावाच्या नव्या नक्षत्रालाही कवठ्याचं पाणी दाखवलं... पण त्यांना आबांसारखा पाऊस आणणारा ‘बारीशकर’ काही दिसेना झालाय. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत सौभद्र’मधलं पद ही मंडळी आळवताहेत...नभ मेघांनी आक्रमिले, तारांगण सर्वहि झाकुनि गेले...परवा कवठ्यात सुमनतार्इंच्या उपस्थितीत बैठक झाली. माजी सभापती अनिल पाटील, पिंटू कोळेकर, चंदूबापू हाक्के तिथं होते. बाजार समिती निवडणुकीत आबांच्या घरची माणसं कवठ्यात प्रचाराला आली नसल्याचा जाब विचारला गेला. काहीतरी सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला, पण कवठेकरांनी ‘सुरेशभाऊ नक्षत्र’ किती फोल ठरतंय, हे ठासून सांगितलं. मिरजेच्या गेस्ट हाऊसवर झालेल्या बैठकीत ‘पतंग’ नक्षत्राच्या पावसात चिंब झाल्यानंतर ‘सुरेशभाऊ नक्षत्र’ कसं तिकडं वळलं गेलं, याचा पाढाच वाचला गेला. भेट तुझी माझी स्मरते, अजुनी त्या दिसाची,धुंद वादळाची होती, रात्र पावसाची...हे मंगेश पाडगावकरांचं गीत मनातल्या मनात म्हणणाऱ्या ‘सुरेशभाऊ’ नक्षत्राच्या कर्तुत्वामुळं आता आम्ही दुसरं नक्षत्र बघतो, असे इशारे चिडलेल्या मंडळींनी दिले. हे सगळं इस्लामपूरला कळवलं गेलं. मग लगेच तिकडून नाकदुऱ्या काढल्या गेल्या म्हणे! या राजकीय सरींमध्ये घोरपडे सरकार मात्र मालामाल झाले. त्यांच्या गटाच्या करपलेल्या कोंबांना ‘पतंग’ नक्षत्रानं जीवदान दिलं...नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं,अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात...असं म्हणत घोरपडे सरकार आता संजयकाका आणि आबा गटालाही वाकुल्या दाखवू लागलेत. आबा असताना तासगावात त्यांचा गट मनभावन श्रावणातल्या सरी अनुभवत होता.श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडेक्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडेअसं तेव्हाचं चित्र होतं. आता खमकं नेतृत्व नाही. ‘जयंत’ नक्षत्राचं विमान बारामतीकरांच्या आदेशामुळं खेळपट्टीवरच थांबून आहे. (या नक्षत्राची करामत बारामतीकरांना ठाऊक आहे. त्याच्या बरसण्यानं तासगावच्या पाटात ‘कमळ’ उद्यान फुलायला वेळ लागणार नाही, हे जाणून असल्यानं त्याला त्यांनी जास्त हालचाल करू दिलेली नाही.) एकमुखी नेतृत्व नाही आणि त्यामुळं ‘अजेंडा’ही नाही. परिणामी...वादळवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गोऽऽअशी अवस्था तिथल्या आबा गटाची झालीय.फुल्ल फॉर्मात असलेलं ‘पतंग नक्षत्र’ सांगली महापालिकेत बरसणार, असं वाटत असतानाच पाऊस पाडणाऱ्या विमानानं ‘यू टर्न’ घेऊन मदनभाऊंना बाय दिला. त्यामुळं किशोरदादा, इद्रिसभाई वगैरे मंडळी हिरमुसली. (अर्थात ही मंडळी कधी कुणाला जवळ करतील आणि कधी कुणाला तोंडावर पाडतील, हे सांगता येत नाही, याचा अंदाज असल्यानंच ‘पतंग नक्षत्र’ मागं फिरलं असावं!)जाता-जाता : यंदा वसंतदादा कारखान्यावर श्रावणातली हिरवी-पोपटी पानं जादाच दिसायला लागलीत. डीसीसी बँकेत विशालदादा निवडून आले. पाठोपाठ बाजार समिती हातात आली. त्यामुळं ‘पतंग’ नक्षत्राच्या साथीनं तिथं नव्यानं पालवी फुटायला लागलीय. शांताबाई शेळकेंची भावगीतं तिथं ऐकायला येताहेत...आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावेजशी अचानक या धरतीवर गर्जत आलीवळवाची सर, तसे तयाने गावे...ताजा कलम : ‘एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नसते’, अशी प्रतिक्रिया एकेकाळी विरोधकांचा गुलाल बघून ‘अस्मिता’ बंगल्यावरून उमटली होती. ‘मोदींच्या गोमूत्रानं अनेकजण पवित्र झालेत,’ असा टोमणाही मारला गेला होता. आता आपल्या चमत्कारामुळं धुँवाधार पाऊस पडू शकतोय, हे स्पष्ट झाल्यानं ‘पतंग’ नक्षत्रानं जिल्हाभरात पाऊस पाडण्याची तयारी केलीय. त्यामुळं बंगल्यावर शांता शेळके-श्रीधर फडके-आशा भोसले या त्रयींची गाणी वाजू लागलीत...ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रूजवायुग विरही हृदयांवर, सरसरतो मधु शिरवा...- श्रीनिवास नागे