पुणे : भारतीय जनता पार्टीचा महापालिकेतील विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा, रणनीतीचा विजय आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे, तिथे जास्त लक्ष दिले व तिथूनही पक्षाला जागा मिळाल्या व स्पष्ट बहुमताच्याही पुढे जाता आले, अशा शब्दांत खासदार संजय काकडे यांनी भाजपाच्या महापालिकेतील यशाचे रहस्य उलगडले.काकडे म्हणाले, ‘‘अगदी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी मला महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यांनीच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह शहरातील आठ आमदार, मी व अनिल शिरोळे हे दोन खासदार अशी दहा जणांची टीम तयार केली. ते स्वत: या टीमचे कॅप्टन होते. ते सूचना द्यायचे व आम्ही त्याचे पालन करायचो. त्याचा परिणाम लगेच दिसायचा. अंतिम परिणाम पक्षाला मिळालेल्या यशातून दिसतोच आहे.’’आम्हाला प्रबळ विरोधकच नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादीला काय करावे, भाजपाचा प्रतिकार कसा करावा तेच समजत नव्हते. सगळ्यांच्या टीकेचा केंद्रबिंदू मीच होतो. ‘बिल्डरने केले तिकीट वाटप’ वगैरे टीका केली जात होती. तिकीटवाटप स्वत: मुख्यमंत्र्यांनी केले आहे, हे त्यांना कोण सांगणार? सांगितले ते होते आहे किंवा नाही याचा ते रात्री कितीही उशीर झाला तरीसुद्धा आढावा घ्यायचे. मला त्यांनी सगळ्या कामांवर लक्ष ठेवायला व काही कामे करायलाही सांगितले होते. ती कामे केल्यामुळेच यश मिळाले, असे काकडे म्हणाले. काकडे म्हणाले, ‘‘पक्षाला किती जागा मिळतील, त्यातील खात्रीच्या कोणत्या याची विचारणा त्यांनी केली. तो अहवाल मिळाल्यानंतर त्यांनी कमकुवत जागांची माहिती मागवली. तेथे पक्षाची मते कसे वाढतील याची व्यूहरचना आम्ही तयार केली. त्यानुसार त्या जागेत पक्षाला किती मते मिळतील त्याचा अंदाज घेतला. विरोधकाला किती मते मिळतील, आपल्याला विजयासाठी किती मतांची गरज आहे याचाही शोध घेतला. त्यानंतर त्या भागातील ५० मते असलेली, १०० मते असलेली कुटुंबे, समाज, सार्वजनिक मंडळे शोधून मी स्वत: त्यांची भेट घेतली. पक्षाचा विचार, ध्येय, धोरण त्यांना समजावून दिले. त्याचा परिणाम म्हणून बरोबर त्या प्रभागातील आमच्या मतांमध्ये वाढ झाली.’’महापालिकेत इतकी वर्षे सत्तेत राहूनही त्या दोन्ही पक्षांनी काही कामच केले नाही. प्रचारातही ते करणार आहोत, करत आहोत, सुरुवात केली आहे असेच कोणत्याही प्रकल्पाबाबत म्हणत होते. त्यातील निरर्थकपणा मतदारांच्या लक्षात आला. भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलावे हाच मतदारांना मोठा विनोद वाटत होता. भ्रष्टाचाराचे सर्वांत जास्त आरोप गेल्या काही वर्षांत कोणावर झाले हे मतदारांना माहिती होते. तोच प्रकार गुंडांना प्रवेश देण्याचा होता. कोण गुंड आहे व कोणाकडे जास्त गुंड आहेत, हेही मतदारांना माहिती होते. त्यामुळेच त्यांच्या आरोपात काही दमच उरला नाही. तुलनेने इतके आरोप होऊनही आम्ही शांत राहून विकासाच्या मुद्द्यांकडेच लक्ष दिले. मतदारांना ते भावले व त्यांनी भाजपाला मतदान केले, असे काकडे म्हणाले.।माझ्यावर सर्वाधिक टीकेचे कारण भाजपातून मराठा नेतृत्व पुढे येत आहे हे त्यांना पटत नसावे. भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक मराठा समाजाचेच आहेत. मराठा समाज भाजपाच्या विरोधात असा चुकीचा प्रचार केला; मात्र मतदारांनी त्याला थारा दिला नाही. कमकुवत जागांवर लक्ष दिल्याने भाजपाच्या बहुमतापेक्षा जास्त जागा येणार अशी माझी पक्की खात्री झाली होती. त्यामुळेच मी ९२ पेक्षा जास्त जागा आल्या नाहीत तर राजकारण संन्यास घेईल, असे धाडसी वक्तव्य केले होते. अंदाज बरोबर ठरला व तोही शहरात चर्चेचा विषय झाला.
मुख्यमंत्र्यांचे नियोजन ठरले महत्त्वाचे
By admin | Updated: March 6, 2017 02:13 IST