ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - महाराष्ट्रात लाट कोणाची हे निवडणूक निकालादिवशी सर्वांनाच कळेल असे सांगतानाच येत्या निवडणुकीत मी मुख्यमंत्री बनून दाखवतो असा ठाम विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांनी मुंबईच्या सभेत व्यक्त केला. शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंतर मुंबईतील पहिल्याच सभेत उध्दव ठाकरे बोलत होते त्यावेळी त्यांनी आपली मुख्यमंत्री बनण्याची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली.
युती तुटल्याचा आनंद नाही. १८ जागा सोडल्या होत्या पण त्यांना आणखी हव्या होत्या आणि त्या देणे शक्य नव्हते. जागावाटपावरून ज्यांनी मांजर समजून ज्याच्या गळयात घंटा बांधली ती मांजर नसून वाघ आहे असे उध्दव ठाकरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मोदींना साथ दिली होती. आता विधानसभा निवडणुकीतही साथ देणार होतो परंतू अनेकांच्या मनात स्वतंत्र लढण्याच्या बाजूने असल्याने युती तुटल्याचे उध्दव यांनी सांगितले. मुख्यमंत्री होण्यासाठी मी हपापलेलो नाही पण कोणी आव्हान दिले तर मी मुख्यमंत्री होवूनच दाखवेल. महाराष्ट्रात सत्ता आल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवेल हे आव्हान मी स्विकारतो असे सांगायलाही उध्दव ठाकरे विसरले नाहीत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कोणता अनुभव होता असा सवालही उध्दव यांनी विचारला. भाजपाला २८८ जागा देवू पण आधी काश्मिरमधील, कर्नाटक सीमेवरील जी जमीन बळकावली आहे ती जमीन आधी घ्या मग २८८ जागा घ्या असे सांगत उध्दव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. राज्यात आता गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा नेता राहिला नाही असे सांगत उध्दव म्हणाले की मुंडे, महाजन यांच्या परिवाराशी असलेले संबंध हे पुढेही कायम राहितील म्हणून पंकजा, प्रीतम मुंडे यांच्याविरूध्द शिवसेना उमेदवार उभे करणार नसल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले. रिपाइं नेते रामदास आठवले हे अजूनही शिवसेनेसोबत आल्यास त्यांना उपमुख्यमंत्री आणि सत्तेत वाटा देवू असे भावनिक आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले.