गुहागर : व्हॉटस्अॅपच्या जमान्यात सध्या जिकडे-तिकडे सेल्फीची क्रेझ आहे. जिकडे जाऊ तिकडे स्वत:चे फोटो काढणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात एखादा सेलिब्रिटी समोर दिसला तर सेल्फीचे उमाळे जरा जास्तच वाढतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मळण येथील दौऱ्यातही नेमके हेच दिसले. अनेकांना मुख्यमंत्र्यांबरोबर स्वत:चा फोटो काढून घ्यायचा होता आणि फडणवीस यांनीही कोणाला नाराज न करता फोटो काढून दिले. त्यामुळे सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. गुहागर तालुक्यातील मळण येथील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी करण्यासाठी काही किलोमीटरचा धुळीने माखलेल्या रस्त्याचा प्रवास करून देवेंद्र फडणवीस प्रकल्पस्थळी पोहोचले. बंधाऱ्याची पाहणी केली करून ते निघत असताना मळण येथील काही ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना दबक्या आवाजात त्यांच्यासह फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रामस्थांची इच्छा कानावर पडताच स्मितहास्य करत फडणवीस फोटोसाठी मागे वळले आणि मळण ग्रामस्थांचा चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढला गेला. व्यस्त दौऱ्यातही मुख्यमंत्र्यांनी सेल्फी काढू दिला, ही बाब मळणवासीय कधीच विसरणात नाहीत, एवढे मात्र नक्की!(वार्ताहर)
मुख्यमंत्र्यांनी भागवली ‘सेल्फी’ बहाद्दरांची हौस
By admin | Updated: May 29, 2015 23:37 IST