मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी ब्लॅकस्टोन उद्योग समुहाशी ४,५०० तर कोकाकोला कंपनीबरोबर ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. करारामुळे राज्यात ५० हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ब्लॅकस्टोन उद्योग समुहासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार देशभरात बुधवारपासून ‘डिजिटल इंडिया वीक’ अभियानास प्रारंभ होत आहे. ब्लॅकस्टोन उद्योग समूह पुण्यातील हिंजेवाडी येथे १,२०० कोटी, मध्य मुंबईतील आयटी पार्कमध्ये १,५०० कोटी, मुंबईतील इतर आयटी पार्कमध्ये १,०५० कोटी आणि ईआॅन फ्री झोन सेझमध्ये ७५० कोटी रुपये याप्रमाणे ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कोकाकोला कंपनी महाराष्ट्रातील लोटे परशुराम (चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिटी बँकेचे प्रबंध संचालक (आॅपरेशन्स) जगदीश राव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. सिटी बँक, मुंबई व पुण्यात कार्यविस्तार करणार असून त्यामुळे ४ हजार नवे रोजगार निर्माण होणार आहेत. अमेरिका आणि भारत उद्योग परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेच्या उद्योग जगतामधील दिग्गजांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली व उद्योगांकरिता घेतलेले निर्णय, मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र यांची माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांकडून ४,५०० कोटींचे करार
By admin | Updated: July 1, 2015 03:21 IST