मुंबई : नवी मुंबईतील केबल व्यावसायिक संजय गुप्ता यांच्या हत्येनंतर तब्बल नऊ वर्षे फरार असलेल्या गँगस्टरला गुन्हे शाखेच्या जबरी चोरी व दरोडाविरोधी पथकाने ठाण्यातून गजाआड केले. जयंत मुळे असे या गँगस्टरचे नाव असून, तो अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा सख्खा साडू आहे.चेंबूर आणि कुर्ला परिसरात २५ वर्षांपूर्वी गुप्ता यांनी केबलचा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू त्यांनी नवी मुंबईतही आपले पाय रोवले. मात्र नवी मुंबईत आधीपासून मुळे यांचा केबल व्यवसाय होता. नवी मुंबईतला संपूर्ण केबल व्यवसाय आपल्या ताब्यात घेण्यासाठी मुळेने राजन टोळी हाताशी धरून २१ मार्च २००५ रोजी गुप्तांची हत्या घडवून आणली. या प्रकरणी राजन टोळीतील काही शूटर्सना अटक करण्यात आली. मात्र मुळे फरार होता. जबरी चोरी व दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अशोक खोत यांना मुळेबाबतची गुप्त माहिती मिळाली. एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील खोत यांच्या पथकाने मुळेला ठाण्यातून अत्यंत शिताफीने अटक केली. (प्रतिनिधी)
छोटा राजनचा नातेवाईक गजाआड
By admin | Updated: October 10, 2014 05:48 IST