वसई : नायगांव पुर्व रेल्वे स्थानकापासून परेरा नगर या मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले असून, या परप्रांतीय फेरीवाल्यांना रेल्वेच्या आर.पी.एफ. ,स्थानीक गुंड आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याची चर्चा केली जात आहे.नायगांव रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील तिकीट खिडकीपासून ते सोपारा खाड़ीवरील पुलापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. मुंबईहून येणारे फेरीवाले फरसाण,टोस्ट,चायनीज भेळ आणि विविध चायना वस्तुंची विक्री करतात.रेल्वेचे आर.पी.एफ.,स्थानीक गुंडआणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचा या फेरीवाल्यांना आशीर्वाद असल्यामुळे त्यांनी जागा अडवून ठेवली आहे. त्यामुळे पिढ्यान पिढ्या खेड्यापाड्यातून भाजी विक्रीसाठी येणाऱ्या आदिवासी महिलांना तसेच मासे विकण्यासाठी येणाऱ्या कोळी महिलांना बसण्यासाठी जागाच मिळेनासी झाली आहे.हफ्ते घेणाऱ्या त्रिमुर्तींचा आशिर्वाद असल्यामुळे हे फेरीवाले दादागिरीचाही वापर करू लागल्यामुळे रात्री किंवा दुपारी एकट्या-दुकट्या येणाऱ्या महिला विशेषत: विद्यार्थ्यानींना धोका निर्माण झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.त्याच प्रमाणे परेरा नगरच्या अंगणवाडीपासून डॉन बॉस्को शाळेपर्यंतच्या रस्त्यावरही फेरीवाल्यांनी बेकायदा टपऱ्या आणि हातगाड्या उभारल्या असून, त्यांच्याकडूनही वसुली करण्यात येत असल्यामुळे कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.या फेरीवाल्यांवर काही महिन्यांपूर्वी महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतरही पुन्हा या टपऱ्या सुरु झाल्यामुळे हप्तेबाजी खरी ठरल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
फेरीवाल्यांचा विळखा
By admin | Updated: September 10, 2016 03:02 IST