नांदिवली : डोंबिवली स्थानकात नेहमीप्रमाणे लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली असताना गुरुवारी पुन्हा १०.३४ ची अंबरनाथ-सीएसटी लोकल १०.५५ ला आल्याने महिला प्रवाशांनी संतापून फलाटावरच रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. महिलांच्या या घोषणाबाजीने डोंबिवली लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाची चांगलीच तारांबळ उडाली. बुधवारीसुद्धा ही लोकल १३ मिनिटे उशिरा आल्याने महिला प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून लोकल रोखून आंदोलन केले होते. दुपारी १२ ची सीएसटीला जाणारी जलदगतीची लोकल रद्द करून १२.३० ची करण्यात आली होती. मात्र, ही लोकलही अर्ध्या तास उशिराने डोंबिवली स्थानकात आली.प्रवाशांना वेळेवर कामावर जाण्याकरिता डोंबिवली स्थानकात लवकर आल्यावर मध्य रेल्वेच्या रोजच्या कटकटीमुळे लोकल उशीर येण्याचा प्रकार पाहावा लागतो. बुधवारी काही महिला प्रवाशांनी या त्रासाला कंटाळून ट्रॅकवर उतरून लोकल रोखून धरली. महिला प्रवाशांच्या या आंदोलनामुळे लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि उपस्टेशन प्रबंधक यादव यांनी महिला प्रवाशांची समजूत काढून १०.३४ ची अंबरनाथ-सीएसटी लोकल वेळेवर डोंबिवली स्थानकात येईल, असे आश्वासन दिले होते. वेळ मारून नेण्याकरिता दिलेल्या या आश्वासनानंतर पुन्हा गुरुवारीसुद्धा ही लोकल १०.५५ म्हणजे १९ मिनिटे उशिराने डोंबिवली स्थानकात आली. आधीच कामावर जाण्यासाठी उशीर आणि त्याच वेळापत्रकानुसार लोकल स्थानकात न येणे, यामुळे महिला प्रवाशांनी पुन्हा रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी १२ ची सीएसटी लोकलही रद्द करून १२.३० ची लोकल येणार असल्याची उद्घोषणा करण्यात आली. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. (वार्ताहर)
डोंबिवलीत रेल्वे प्रशासनाविरोधात महिला प्रवाशांची घोषणाबाजी
By admin | Updated: November 21, 2014 02:28 IST