ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. वर्धा व गडचिरोली पाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाली असून हा पट्टा दारूमुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा सरकारातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक लढवताना चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, ते सरकारने पाळल्याचे दिसत आहे.
गेली पाच वर्षे दारूपोटी हजारो संसार उध्वस्त झाले असून जवळपास एक लाख सह्यांची मोहीम महिलांनी राबवली होती. त्यासाठी महिलांनी मुंडन आंदोलन केले होते तसेच ६०० ग्रामपंचायतींनी दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर केला होता. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सातशे कोटी रुपयांची दारू दर वर्षाला रिचवली जात होती यावरून या निर्णयाची व्याप्ती व त्याचा महसूलावर होणारा परिणाम दिसून येतो.
शासनाचा निर्णय योग्य असून स्वागत व अभिनंदन करण्यासारखा असल्याचे मत अभय बंग व विकास आमटे यांनी केले आहे. तसेच या निर्णयाची अमलबजावणी कशी केली जाते हे बघणे महत्त्वाचे असल्याचे बंग व आमटे म्हणाले.