अतुल कुलकर्णी, मुंबईभाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून सनदी अधिकारी आणि मंत्र्यांमधील वाद एवढे विकोपाला गेले आहेत की अनेक अधिकारी दीर्घ रजेवर गेले आहेत, तर काही चांगल्या अधिकाऱ्यांना मुदतीपूर्वीच बदल्यांना सामोरे जावे लागत आहे. परिवहन आयुक्त महेश झगडे आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यातील विसंवाद सर्वश्रुत आहेच. या वादाची परिणती शेवटी झगडे यांच्या बदलीत झाली. आरटीओमधील गैरव्यवहाराविरुद्ध झगडे यांनी धडक मोहीम उघडली होती. त्यामुळे त्यांच्या बदलीची वार्ता समजताच आरटीओ कार्यालयात दिवाळी साजरी झाली. पुरवठामंत्री गिरीश बापट आणि महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यातही विस्तव जात नाही. श्रीवास्तव हे मंत्र्यांचे आदेश पाळत नाहीत, असा थेट आरोप बापट यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केला. शिवाय, अन्नपुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांच्याविषयीही बापटांची नाराजी आहेच. दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि गृहनिर्माण सचिव सतीश गवई यांच्यातही खटके उडत असल्यामुळे गवई दीर्घकालीन रजेवर गेले. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विभागात सचिव म्हणून देवाशिष चक्रवर्ती यांना देण्यात आले होते मात्र चक्रवर्ती यांनी रुजू होण्यास नकार दिला. वैद्यकीय शिक्षण विभागातील मेधा गाडगीळ यांची आणि तंत्रशिक्षण विभागाचे सचिव संजय चहांदे ‘प्रोअॅक्टीव्ह’ नाहीत असे सांगत गाडगीळ यांची बदली करण्यात आली. त्यामुळे मेधा गाडगीळ १५ दिवसांच्या रजेवर निघून गेल्या आहेत.
मंत्र्यांचे अधिकाऱ्यांशी खटके वाढले
By admin | Updated: May 15, 2015 02:03 IST