चाकण : महिला दक्षता समितीच्या सदस्या ज्योती कड व नाणेकरवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या दीपा नाणेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम महिला अधिकारी पाहिजे असल्याची मागणी केली. महिला दक्षता समिती अद्याप जाहीर का केली नाही, असा सवाल केला. समिती असूनही अद्याप एकही बैठक घेतलेली नसून, महिलांच्या समस्या सुटत नाहीत. त्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची जागा त्वरित भरण्याची मागणी त्यांनी केली. तसेच दीपा नाणेकर यांनी चाकण व बारा वाड्या आणि ६५ गावे समाविष्ट असलेले चाकण हे जिल्ह्यातील मोठे पोलीस ठाणे आहे. येथे महिलांचे गुन्हे तपासासाठी व महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला पोलीस अधिकारी नाही, याबाबत खंत व्यक्त करून वाहतूककोंडीबाबत व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘सिग्नलजवळ गाड्या थांबल्याने रस्ता ब्लॉक होतो. बसचालक अरेरावी करतात. जड वाहने मुख्य रस्ता सोडून सर्व्हिस रस्त्यावर येतात व वाहतुकीची कोंडी करतात. अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करायची सोडून बघ्याची भूमिका घेतात. या वाहनांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे.’’महिलांच्या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे म्हणाले, ‘‘महिलांविषयीच्या गुन्ह्याच्या प्रमाणावरून पोलीस ठाण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची मागणी करता येते. पुणे जिल्ह्यात सगळीकडेच महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात मंचर येथे एक महिला अधिकारी आहे.’’ सहायक पोलीस निरीक्षक एम. के. ढवाण म्हणाले, ‘‘चाकण पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नाही. महिला अधिकाऱ्यांना बंदोबस्ताच्या धर्तीवर प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. तुमच्या समस्या महिला पोलिसांना सांगू शकता.) त्यांच्याशी थेट बोलू शकता. जिल्ह्यात ३५ पोलीस ठाणी आहेत. सगळ्याच ठिकाणी महिला अधिकारी नाहीत.’’ महिला दक्षता समितीमध्ये महिलांचे वाद आहेत. ते महिला पोलिसांनी मिटविले पाहिजेत, असे ज्योती कड यांनी सुचविले. (वार्ताहर)
चाकण पोलीस ठाण्यात हवा सक्षम महिला अधिकारी
By admin | Updated: May 21, 2016 01:30 IST