मुंबई : शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, यासाठी मुंबई विद्यापीठ सर्वोपरी प्रयत्न करीत असते. विद्यापीठावर पडणारा ताण दिवसेंदिवस वाढत असताना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाची कास धरत गेल्या ५ वर्षांत १0१ अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे विद्यापीठात आजमितीला ३८६ अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.मुंबई विद्यापीठाचा आवाका प्रचंड मोठा आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर ते ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असते. परंतु विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या ७४0च्या घरात पोहोचल्याने विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण वाढत आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय सहज उपलब्ध व्हावी, यासाठी विद्यापीठाने ५ वर्षांत किती नवीन तुकड्या आणि अभ्यासक्रमांना मंजुरी दिली याबाबतचा प्रश्न सिनेट सदस्य डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये विद्यापीठाने गेल्या ५ वर्षांत ३१८ नवीन तुकड्या आणि १0१ नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे.विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये, संस्था आणि विद्यापीठ विभागात एकूण ६ लक्ष ६० हजार ४३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण पडत असून, यावर उपाययोजना करण्यासाठी विद्यापीठाने प्रशासकीय कामाचे संगणकीकरण, एक्झाम रिफॉर्म, उपकेंद्रांची निर्मिती केली आहे. विद्यापीठाच्या उपकेंद्रात एकात्मक आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
विद्यापीठाची पाच वर्षांत अभ्यासक्रमांची शंभरी
By admin | Updated: April 13, 2015 05:43 IST