ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 14 - गत वर्षी डोंबिवलीमधील फडके रोडवर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मोठी गर्दी झाली होती. नुसती गर्दी न होता महापालिकेच्या बस थांबवून त्याच्यासमोर सेल्फी काढणे, रस्त्याच्या मध्यभागी गर्दी करणे असे प्रकार घडले होते. यामुळे मागील वर्षी संध्याकाळी रहदारी थेट घरडा सर्कलपर्यंत होती. यावर्षी असे होऊ नये याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, डोंबिवली शाखेकडून युवकांना आवाहन करण्यात येत आहे.
'पोलीस मित्र' म्हणून एक तास द्या..
फडके रोड वर येणाऱ्या सर्व तरुणांना विनंती करून, रहदारी होणार नाही आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांना मदत म्हणून त्यांच्या सोबत व्हॉलेंटीअरचे काम करण्याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढाकार घेत आहे. विविध 'डे' साजरे करण्यास काहीच हरकत नाही, परंतु उत्साहात साजरा करताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ. डोंबिवली सुसंकृत शहर आहे, हे ध्यानात ठेवून आजचा व्हॅलेंटाइन साजरा करू, या करीता हा उपक्रम ठरवला आहे.
सोमवारी यासंदर्भातील एक पत्र आरटीओ अधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांना दिले तेव्हा त्यांनीही याची गरज आल्याचे सांगून अधिक विद्यार्थ्यांनी, तरुणांनी मदत करण्याचे आवाहन केले. मागील वर्षी याच गर्दीमुळे एका रुग्णवाहिकेला आपला मार्ग बदलून जावे लागले होते, याची आठवण करून डोंबिवलीसारख्या शहरात अशी परिस्थिती येते याबद्धल खेदही व्यक्त केला.
चला तर मग, या आमच्या मदतीला. ज्या तरुण तरुणींना यामध्ये सहभागी होऊन मदत करायची आहे त्यांनी संध्याकाळी ६ ते ९ या वेळात १ तास द्यावा. काम फक्त एकच रस्त्यावर रहदारी होणार नाही याची काळजी घेणे आणि 'पोलीस मित्र' म्हणून पोलिसांना मदत करणे. सर्वांनी संध्याकाळी ६.०० वाजता रामनगर पोलीस स्थानकात पोलीस मित्र कक्ष येथे भेटावे. आवश्यक नोंदणी तेथे करण्यात येईल असे आवाहन अभाविप, डोंबिवलीतर्फे मिहीर देसाई यांनी केले आहे