मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठीचे योगदान कायमस्वरूपी स्मरणात राहावे, यासाठी डॉ. नीरज देव यांनी सावरकरांची पुण्यतिथी ‘देशभक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात डॉ. देव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठविले असून प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ‘देशभक्ती दिन : एक दिवस देशासाठी’ या अंतर्गत सर्वसामान्यांनी एक दिवसाचे उत्पन्न राष्ट्रासाठी अर्पण करावे, असे आवाहन डॉ. देव यांनी केले आहे. शिवाय, जमा झालेल्या निधीचा उपयोग सैन्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रखरेदी, निर्मिती आणि विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाकरिता वापरावा असेही त्यांनी सुचविले. या दिवशी केवळ भाषणांच्या कार्यक्रमांची आखणी न करता एका दिनाचा आदर्श सर्वसामान्यांना घालून द्यावा, असे डॉ. देव यांनी म्हटले आहे.डॉ. देव यांनी ‘देशभक्ती : तुझे नाव सावरकर’ या विषयाला अनुसरून व्याख्यान उपक्रमाला २६ फेब्रुवारी २०११ रोजी आरंभ केला. त्या वेळी त्यांनी पहिल्यांदा या मागणीचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर विविध व्याख्यानांमध्येही याविषयी भूमिका मांडली. (प्रतिनिधी)
सावरकरांची पुण्यतिथी ‘देशभक्ती दिन’ साजरा करा
By admin | Updated: November 3, 2014 04:30 IST