मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात असतानाच आता कोकण रेल्वेवरील स्थानकेही सीसीटीव्हींच्या कक्षेत आणण्यात येत आहेत. कोकणच्या तब्बल १७ स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मडगावमध्ये १७ स्थानकांवरील सीसीटीव्हींचे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. कोकण रेल्वेवरील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यावर कोकण रेल्वेकडून कामही केले जात होते. गणेशोत्सव, शिमगा, दिवाळीसह अन्य सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने संशयित प्रवासी, सामानावर हालचाली ठेवणे रेल्वे सुरक्षा दलाला कठीण जात होते. हे पाहता कोकण रेल्वेने १७ स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये रत्नागिरी क्षेत्रातील कोलाड, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी तर कारवार क्षेत्रातील पेडणे, करमाळी, काणकोण, कारवार, गोकर्णा, भटकळ, उडपी आणि सुरथकळ स्थानकांवर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. प्रत्येक स्थानकावर १२ ते १६ डोम आणि बॉक्स प्रकारातील सीसीटीव्ही बसविल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. जवळपास ३0 दिवसांचे चित्रीकरण या कॅमेऱ्याद्वारे होईल. स्थानकांवरील प्रवेश, लॉबी, प्लॅटफॉर्म, तिकीट आरक्षण खिडक्यांसह अन्य परिसर या कॅमेऱ्यांच्या कक्षेत येणार आहे. (प्रतिनिधी)>स्वच्छतेवरही लक्षस्थानकांवरील स्वच्छतेवरही या कॅमेऱ्यांद्वारे लक्ष देण्यात येईल. यासाठी स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्येही एक एलईडी मॉनिटर बसविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या केबिनमध्येही अशा प्रकारे मॉनिटर बसविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. >मडगाव येथील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात १७ स्थानकांवरील सुरक्षा हाताळण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १९ एलईडी डिस्प्ले बसविण्यात आले आहेत. २४ तास सुरक्षा, स्वच्छतेवर याद्वारे लक्ष ठेवण्यात येईल. स्थानकांवरील कॅमेरे हे सर्व आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरा) प्रकारातील कॅमेरे आहेत.
कोकणातील १७ स्थानकांवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’
By admin | Updated: September 5, 2016 04:52 IST