नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय बसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेगनियंत्रक बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रायोगिक स्तरावर नागपुरातील सीबीएसईच्या पाच शाळांच्या बसमध्ये ही यंत्रणा लागणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०११ च्या तरतुदीनुसार जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीची बैठक सोमवारी पार पडली. दिल्ली सीबीएसई बोर्डाकडून याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना आल्या असून त्याची सर्व शाळांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी या वेळी दिल्या. शालेय बसच्या खिडकीवर तारेची जाळी बसविण्यात यावी. शाळेच्या बसचा वेग ४० कि.मी. प्रति तास करावा आणि त्यासाठी बसमध्ये वेगनियंत्रक बसविण्यात यावे. सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस प्रणाली या वाहनामध्ये बंधनकारक करण्यात यावी आणि ही उपकरणे कायम चालू स्थितीत असावीत, असे ‘सीबीएसई’च्या परिपत्रकात म्हटले आहे. या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. बऱ्याच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी असतात. आयुर्मान संपलेल्या वाहनामार्फतही वाहतूक सुरू असते याकडे लक्ष वेधून डॉ. व्यंकटेशम यांनी नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही
By admin | Updated: March 1, 2017 05:27 IST