नागपूर विद्यापीठ : अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा विद्यार्थ्यांना फटकानागपूर : ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अजूनही भोंगळ कारभारच सुरू असल्याचे चित्र आहे. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ‘सीबीएस’ (क्रेडीट बेस सिस्टीम)पद्धतीच्या सर्व परीक्षा ‘पोस्टपोन’ कराव्या लागल्या आहेत. अनेक ‘पेपर्स’चे ‘मॉडरेशन’च झाले नसल्याने परीक्षा विभागाची अडचण झाली आहे. १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा आता २६ नोव्हेंबरकडे सुरू होण्याचे अंदाज आहेत. विद्यापीठात ‘मॉडरेशन’चे संकट असल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच सर्वात अगोदर दिले होते. विधानसभा निवडणुकांमुळे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना यंदा १० दिवस उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे उर्वरित परीक्षा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी गंभीरतेने प्रयत्न होणे आवश्यक होते. परंतु महाविद्यालयांवर अगोदरपासूनच वचक नसलेल्या परीक्षा विभागाचा कार्यभार ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांकडे असल्याने प्राध्यापकांचे चांगलेच फावले. कधी निवडणुका, तर कधी दिवाळीची सुटी अशी निरनिराळी कारणे देत अनेक प्राध्यापक ‘मॉडरेशन’च्या कामात अनुपस्थित राहिले अन् त्याचा फटका परीक्षांना बसला. प्रश्नपत्रिकांचे ‘मॉडरेशन’च झाले नसून अ़नेक विषयांच्या तर प्रश्नपत्रिकादेखील तयार नाहीत. अशा स्थितीत केवळ ३ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून ‘प्रिंटींग’ कसे होणार या विवंचनेत पडल्याने परीक्षा विभागाला ‘सीबीएस’ प्रणालीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)कोण आहे जबाबदार ?विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा १० आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या. परंतु विधानसभा निवडणुकांमुळे त्या १० दिवस समोर ढकलाव्या लागल्या. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परीक्षा विभागाची जबाबदारी डॉ.श्रीकांत कोमावार यांच्याकडे होती. या काळातच हिवाळी परीक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलणे आवश्यक होते. परंतु प्राध्यापकांवर वचकच नसल्याने ‘मॉडरेशन’चे काम वेळेत पूर्ण झाले नाही. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकारदेखील घेतला नाही. कोमावार यांच्यानंतर प्रशांत मोहिते यांच्याकडे परीक्षा विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यांनी जबाबदारी स्वीकारताच त्यांच्यासमोर आव्हान होते ते हिवाळी परीक्षांना सुरुवात करण्याचे. परंतु इतर प्रशासकीय बाबीतील सावळागोंधळ सावरण्यातच त्यांचा वेळ गेला. त्यामुळे आता या स्थितीसाठी नेमके जबाबदार कोण हे शोधण्याची तसदी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे घेतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांपर्यंत माहिती जाणार कधी?दरम्यान, या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांचे मात्र नाहक हाल होत आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा ‘पोस्टपोन’ झाल्याची अफवा आहे की नेमके काय अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. मोठमोठे दावे करणाऱ्या विद्यापीठाची ‘कम्युनिकेशन’ यंत्रणाच जणू कोलमडली आहे. त्यामुळेच अद्यापपर्यंत परीक्षा समोर ढकलण्यात आल्याची बाब संकेतस्थळावर टाकण्यात आलेली नाही. परीक्षा प्राध्यापकांच्या हलगर्जीपणामुळेच ‘पोस्टपोन’ झाल्या असल्याची माहिती परीक्षा विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. यासंदर्भात प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
‘सीबीएस’ पद्धतीच्या परीक्षा ‘पोस्टपोन’
By admin | Updated: November 12, 2014 00:54 IST