हरीश गुप्ता , नवी दिल्लीदोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण विरोधकांना सोबत घेऊन चालण्याचे आश्वासन संसदेत दिले होते; मात्र एलटीसी घोटाळ्याच्या निमित्ताने सीबीआयच्या राजकीय वापराचा मुद्दा उपस्थित करीत तृणमूल काँग्रेसने रालोआ सरकारवर पहिली तोफ डागली आहे.बसपा आणि अन्य पक्षांनी मौन पाळले असताना तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. तृणमूल काँग्रेस, बसपा, मिझो नॅशनल फ्रंटच्या खासदारांनी प्रवास घोटाळा घडवून आणल्याबद्दल सीबीआयने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये संपुआ सरकारच्या कारकीर्दीत गुन्हा दाखल केला होता पण अचानक सीबीआयने सक्रिय होत शुक्रवारी पहाटे या पक्षांच्या खासदारांच्या निवासस्थानी छापे मारल्याने राजकीय वातावरण तापले आहे.मुख्य विरोधी पक्षांवर सूड उगविण्यासाठीच छापे मारण्यात आल्याचा आरोप ओ ब्रायन यांनी केला आहे. एलटीसी घोटाळ्याशी संबंधित काही दस्तऐवज मिळविण्यासाठी सीबीआयने तृणमूलचे राज्यसभा सदस्य डी. बंडोपाध्याय यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापे मारताना त्यांच्याशी साधी चर्चाही केली नाही, याकडे ओ ब्रायन यांनी निवेदनात लक्ष वेधले. दरम्यान,डी. बंडोपाध्याय(तृणमूल काँग्रेस), ब्रजेश पाठक (बसपा), लाहमिंग लियाना(मिझो नॅशनल फ्रंट) हे तीन विद्यमान तर जेपीएन सिंग(भाजप), मेहमूद ए मदानी(रालोद), रेणू प्रधान(बिजद) या तीन माजी राज्यसभा सदस्यांसह काही ट्रॅव्हल एजन्टांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीबीआयने काही राजकारणी आणि ट्रॅव्हल एजंटच्या दिल्ली आणि ओडिशातील दहा ठिकाणांवर छापे घालून शोधमोहीम चालविली आहे. गेल्यावर्षी १ नोव्हेंबर रोजी पहिला गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर कागदपत्रांची छाननी केली असता या प्रकरणाशी गुन्हेगारी संबंध आढळून आले आहे.
खासदारांवर सीबीआय छाप्यांनी राजकीय वादंग
By admin | Updated: June 14, 2014 04:53 IST