नागपूर : वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर आश्रमशाळेच्या संचालकाच्या खोट्या तक्रारीवरून पत्रकारांवरच गुन्हे दाखल करण्यात आल्याने सर्वत्र तीव्र रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी नागपूर श्रमिक पत्रकार संघाने तातडीची बैठक घेऊन या प्रकरणाचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्र्यांकडेही या प्रकरणाची माहिती पाठविण्यात आली. दुसरीकडे मुंबईतील पत्रकारांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत हल्ला करणारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हिंगण्याजवळच्या उखळी येथे अहिल्यादेवी होळकर आश्रमशाळा आहे. या शाळेत संस्थासचिव श्रीकृष्ण मते जास्त पटसंख्या दाखवून अनुदान लाटतो. अन्नधान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तूत घोळ करतो. त्याचप्रमाणे शाळेत अनेक गैरप्रकार चालतात अशी तक्रारवजा माहिती मिळाल्याने आयबीएन लोकमतच्या वृत्तसंकलक सूरभी शिरपूरकर, कॅमेरामन प्रशांत मोहिते, सुनील लोंढे, महाराष्ट्र नंबर-१ या वृत्तवाहिनीचे ब्युरोचीफ गजानन उमाटे आणि कॅमेरामन सौरभ होले सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास वृत्तसंकलनासाठी आश्रमशाळेत गेले होते.
ते आपले कर्तव्य बजावत असताना संस्थासचिव मते, त्याचा मुलगा आणि अन्य साथीदारांनी पत्रकारांना शिवीगाळ सुरू केली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी कॅमेरे हिसकावून सर्वांना मारहाण सुरू केली. या घटनेची तक्रार पत्रकारांनी हिंगणा पोलीस ठाण्यात नोंदवत असताना मते आणि त्याचे साथीदार पोलीस ठाण्यात पोहचले. घटनेच्या वेळी उपस्थित नसलेल्या महिला अधीक्षक नंदा गजभिये यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उपरोक्त पत्रकारांविरुद्ध मारहाण करून विनयभंग केल्याची तसेच शासकीय कामात अडथळा केल्याचे तक्रारीत नमूद केले.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकरणाची माहिती सर्व वरिष्ठ पोलीस अधिका-यांना तातडीने कळविण्यात आली. त्यामुळे पोलीस उपायुक्त राकेश कलासागर लगेच पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र, गजभिये यांच्या तक्रारीची शहानिशा न करता ह्यकाउंटर कम्प्लेंटह्णच्या आधारे पोलिसांनी उपरोक्त पत्रकारांवरही गंभीर गुन्हे दाखल केले.
एकीकडे हल्ला केला आणि हल्ला करणाऱ्यांनीच खोटी तक्रार नोंदवून संबंधित पत्रकारांवर गुन्हेही दाखल करून घेतले, हा प्रकार पत्रकार जगतात तीव्र रोष निर्माण करणारा ठरला आहे. राज्यातील अनेक ठिकाणच्या पत्रकारांकडून त्याचा निषेध नोंदवला जात आहे. मंगळवारी नागपूर श्रमिक पत्रकार संघाने तातडीची बैठक घेऊन या प्रकरणी निषेध नोंदवला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष ब्रह्माशंकर त्रिपाठी होते. पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, पत्रकार संघाचे महासचिव शिरीष बोरकर यांच्यासह अनेक पत्रकार या बैठकीत उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली.
भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठीही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती करण्यात आली. दुसरीकडे मुंबईतील पत्रकारांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवत कडक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. स्थानिक पत्रकारात या घटनेने कमालीचा रोष निर्माण केला असून, पोलिसांनी खोट्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची तत्परता कोणत्या कारणामुळे दाखवली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.