मुंबई : राखीव निवडणूक चिन्ह न मिळालेल्या पक्षांसाठी आणि अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने काही ‘मुक्त निवडणूक चिन्हे’ उपलब्ध केली आहेत. या यादीतील ‘कप -बशी’ या निवडणूक चिन्हाला राज्यभरातील उमेदवारांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. तर चार उमेदवारांनी गाजर हे चिन्हे घेतलेण २८८ मतदारसंघांपैकी २१२ मतदारसंघांत या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढविणारे उमेदवार आहेत. त्या खालोखाल रिक्षा, नारळ, शिटी, खाट, बॅट, गॅस सिलेंडर, टीव्ही या चिन्हांना शंभरहून अधिक उमेदवार निवडणूक लढविणार आहे. आयोगाने मान्यता दिलेल्या मिक्सर, नेलकटर, दाढीचे ब्लेड, खिडकी या चिन्हांकडे मात्र उमेदवारांनी पाठ फिरविली आहे. या चिन्हांवर एकही उमेदवार निवडणूक लढवित नसल्याचे आयोगाने जाहीर केलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. तर सतरंजी, दप्तर, तंबू, फ्रॉक आदी काही चिन्हांची राज्याभरात अवघ्या एका उमेदवाराने निवड केली आहे.डॉक्टरांच्या उपयोगाचे यंत्र असणाऱ्या स्टेथोस्कोपची निवडही मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांतील प्रत्येकी एका अपक्ष उमेदवाराने केली आहे. विशेष म्हणजे हे तीनही उमेदवार डॉक्टर आहेत. हिरवी मिर्ची १३, चप्पल १०, बॅट्समन १७, शिलाई यंत्र ७१, बैलगाडी ५१, कोट ५१ अशा काही वैशिष्टपूर्ण चिन्हांची निवड करणाऱ्या उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. (प्रतिनिधी)
चार उमेदवारांच्या हाती ‘गाजर’
By admin | Updated: October 13, 2014 05:11 IST