आॅनलाईन लोकमत
रहिमतपूर (सातारा), दि. 5 - कोरेगाव तालुक्यातील पुसेसावळी-नागझरी दरम्यान असलेल्या घाटातून येत असलेल्या एका कारमधून रविवारी सकाळी अचानक धूर येऊ लागला. धूर येत असल्याचा संशय आल्याने चालकाने कार रस्त्याच्या बाजूला घेत चालू गाडीतून उडी घेतली . काही क्षणात कार जळून खाक झाली. चालू गाडीतून उडी घेतल्याने चालक सचिन शिंदे हे थोडक्यात बचावले.
रहिमतपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरेगाव येथील सचिन रामचंद्र शिंदे रविवार, दि. ५ रोजी लोणंद येथून भाडे घेऊन पुसेसावळी येथे सोडायला गेले होते. प्रवासी पुसेसावळी येथे सोडून ते पुन्हा कण्हेरखेड या त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी कार (एमएच १४ सीएक्स ६११३) मध्ये सचिन शिंदे हे एकटेच होते.
त्यांची कार सकाळी साडेनऊच्या सुमारास नागझरी घाटात आली असता अचानक धूर येऊ लागला. धूर कोठून येत आहे, हे पाण्यासाठी त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता कारने पेट घेतला. यावेळी शिंदे यांनी चालत्या कारमधून उडी घेतल्याने ते वाचले. त्यानंतर त्यांनी कार रस्त्यावरच सोडून माळरानात पळ काढला. प्रवाशांना यापूर्वी सोडले असल्याने मोठा अनर्थ टळला. शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वीच नवीन कार खरेदी केली होती. यामध्ये सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले. या घटनेची रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हवालदार एस. जे. शिंदे तपास करत आहेत. (वार्ताहर)