- राजेश भिसे/शेषराव वायाळ , जालनाबारावीच्या विविध विषयांच्या पुनर्लिखित उत्तरपत्रिकांद्वारे गुणवाढ करुन देणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे परीक्षा मंडळातही असल्याचे सोमवारी निष्पन्न झाले. जालना पोलिसांनी मंडळाच्या औरंगाबाद कार्यालयात छापा टाकत चार लिपिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले तसेच महत्त्वाची कागदपत्रे व दस्तावेजही जप्त केले. जालन्यात १८ मार्चला पोलिसांनी दोन हजार ५०० पुनर्लिखित उत्तरपत्रिका आणि तब्बल पाच हजार कोऱ्या उत्तरपत्रिका आणि तितकेच होलोक्राफ्ट जप्त केले होते. वसतिगृहचालक श्रीमंत वाघसह अंकुश पालवे, सुदीप राठोड, गजानन टकले, अमोल शिंदे आणि प्रा. शिवनारायण शेषराव कायंदे यांना आतापर्यंत अटक झाली. सुदीप राठोड आणि अंकुश पालवे हे न्यायालयीन कोठडीत असून, श्रीमंत वाघला सोमवारी न्यायालयाने ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गजानन टकले आणि अमोल शिंदे हे पोलीस कोठडीतच आहेत.परतूर येथून रविवारी दुपारी प्रा. शिवनारायण शेषराव कायंदे यास अटक करुन त्याच्याकडून १८ संशयास्पद उत्तरपत्रिकांसह २८ हजार रुपये जप्त केले होते. परीक्षा मंडळाच्या कर्मचाऱ्यांवरही पोलिसांना संशय होता. तसे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात दिले होते. हे खरे ठरले. जालना पोलिसांनी सोमवारी औरंगाबाद येथील परीक्षा मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरेंशी चर्चा केली. योगेश पालेपवाड, रमेश गायकवाड, दीपक शिंदे आणि अशोक नंद यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पिशोरचे दयानंद महाविद्यालय, बाजारसावंगी येथील दयानंद महाविद्यालय आणि जालनातील इंदिरा महाविद्यालयाच्या सहभागाचे पुरावे पोलिसांनी शिक्षण उपसंचालकांकडे सुपूर्द केल्याची माहिती परीक्षा मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
परीक्षा मंडळाचे चार लिपीक ताब्यात
By admin | Updated: March 29, 2016 01:20 IST