नागपूर : सिव्हिल लाइन्स येथील महालेखाकार (लेखा व हकदारी) कार्यालयात अधिकारी व कर्मचारी अतिरिक्त असल्याने त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागाच्या कॅन्टिनच्या कामात जुंपले आहे. महिन्याला ४१ रुपयांच्या तोट्यात चालणाऱ्या या कॅन्टिनमध्ये कार्यरत आठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर सरकार महिन्याकाठी ३ लाख २८ हजार ५५८ रुपयांचा खर्च करीत असल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.सरकारने नेमून दिलेली कामे न करता येथील वरिष्ठ अकाऊटंट कॅन्टिनमध्ये व्यवस्थापक, कॅन्टिन अकाऊटंट आणि नाश्ताचे पैसे घेण्याचे काम करीत आहेत. यांची प्रतिनियुक्ती थेट डेप्युटी अकाऊटंट जनरलने केल्याची माहिती प्रल्हाद खरसने यांना माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे.कार्यालयात वरिष्ठ अकाऊटंट पदावर कार्यरत असलेल्या एन. सी. मरियन यांच्याकडे कॅन्टिन व्यवस्थापकाची जबाबदारी असून दुसरे वरिष्ठ अकाऊटंट बी. एस. हेडाऊ हे कॅन्टिनचा लेखाजोखा सांभाळतात. एच. व्ही. भगत हे हलवाई आहेत. डी. एल. धावने हे सहायक हलवाई असून एस. सी. कांबळे हे चहा बनवितात. अन्य कर्मचारी आर.जे. मसराज आणि ओ.एम. ढाकुलकर हे बेरर म्हणून काम पाहतात. कार्यालयात अकाऊटंट पदावर कार्यरत एस. एच. नगरारे हे कॅश काऊंटरची जबाबदारी सांभाळतात. कदाचित शिक्षा म्हणून त्यांना कॅन्टिनमध्ये नियुक्त केल्याची चर्चा आहे. सन १९९८ पासून कॅन्टिनचे कामकाज अधिकारी व कर्मचारी सांभाळीत आहे. (प्रतिनिधी)
सरकारी कर्मचारीच कॅन्टिन चालक
By admin | Updated: April 27, 2016 06:36 IST