नागपूर : एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) तसेच स्वतंत्र विदर्भ या दोन्ही बाबतींत भाजपा आपल्या मूळ भूमिकेवर ठाम असून, राज्य सरकार अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही यू टर्न घेतला नसल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे स्पष्ट केले. त्यावर लागलीच राजकीय पडसाद उमटले. एलबीटी मुद्द्यावर सरकारने घूमजाव केल्याची टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरातच केली. तर विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना मुख्य विरोधी पक्षाच्याच भूमिकेत पाहायला मिळेल, असे विधान खा. संजय राऊत यांनी केले आहे.राज्यातील ‘एलबीटी’ रद्द करण्याच्या मुद्द्यावर रविवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. भाजपा आपल्या भूमिकेवर कायम असून, येत्या एक महिन्यात एलबीटी रद्द करण्यात येईल, असा दावा गडकरी यांनी केला. तीन दिवसांअगोदरच पर्यायाविना एलबीटी तूर्तास रद्द करणे शक्य नसल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली होती. शिवाय मुंबई महापालिकेतील कर्मचारी संघटनाही एलबीटीच्या विरोधात असल्याने या मुद्द्यावरून परत राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
महिन्यात एलबीटी रद्द करू
By admin | Updated: November 24, 2014 03:56 IST