वाल्हे : भिवंडी-सांगोला या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसच्या वाहकाने आज वाल्हे येथील विद्यार्थिनीला अरेरावी करून तिच्या कॉलरला धरून ढकलण्याने मुलीच्या तक्रारीवरून वाल्हे येथे पोलिसांच्या मदतीने ग्रामस्थांनी संबंधित एसटी बस अडवून वाहकाला ताब्यात घेतले.अमृता भुजबळ सासवड येथे महाविद्यालयात शिकत असून आज दुपारी घरी जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढली असता वाहक चंद्रकांत वाघे याने या एसटी बसला विद्यार्थी पास चालत नाही, असे सांगून तिला जबरदस्तीने बसमधून उतरण्यास भाग पाडत असताना तिच्या मानेला नखाने ओरखडल्याची जखम झाली. याबाबत कोणत्या दादाला सांगायचे ते सांग, असे म्हणत तिला अरेरावी केल्यामुळे विद्यार्थिनीने वाल्हे येथे भ्रमणध्ननीवरून घडलेली घटना नातेवाइकांना सांगितली. त्यावरून नातेवाइकांनी वाल्हे पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी त्या एसटी बसला वाल्हे पोलीस दूरक्षेत्रासमोर थांबवून वाहकाला ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्या जबानी घेण्यात आल्या. सासवड येथून भिवंडी-पंढरपूर-सांगोला वाल्हे मार्गाने जाणाऱ्या एसटी बसमधून (एमएच १४ बीटी ३९८१) वाल्हे येथे जाण्यासाठी बसमध्ये वाल्हे येथील रहिवासी असलेल्या विद्यार्थिनीला या एसटीला पास चालत नाही, असे सांगून शिवीगाळ करीत विद्यार्थिनीच्या कॉलरला धरून तिला खाली ढकलल्याने संबंधित विद्यार्थिनीने असभ्य वर्तन करणारा बसचा वाहक चंद्रकांत विश्वनाथ वाघे (वय ४२, बॅच नं. ४६५८, भिवंडी आगार) याच्याविरुद्ध वाल्हे पोलीस दूरक्षेत्रामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बसवाहकाने काढले विद्यार्थिनीला बसबाहेर
By admin | Updated: July 20, 2016 01:16 IST