लोणी काळभोर : काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटातील नायिका काव्या आवडीची साडी खरेदी करण्यासाठी लग्नाआधीच दिल्लीला जाते. अशीच काहीशी घटना लोणी काळभोरमध्ये घडली आहे. येथील एका वधुने मनासारखी साडी न मिळाल्याने शुभमंगल - ‘सावधान’ होण्याआधीच पलायन केले. पतीने लग्नासाठी पाठविलेल्या साड्या न आवडल्याने वधूने ‘शुभमंगल सावधान’ होण्याच्या १६ दिवस आधीच पलायन केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आपली मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. फिर्यादीचा मुलगा व मुलगी या दोघांचेही विवाह ठरला असून, तो दि. ९ फेब्रुवारी रोजी एकाच मंडपात होणार होता. विवाहाची तारीख जवळ आल्याने घरात लगीनघाई सुरू होती. लग्नासाठी लागणारे कपडे व गृहोपयोगी साहित्याची खरेदी सुरू होती. चार दिवसांपूर्वी २० वर्षीय तरुणीच्या नियोजित पतीने लग्नासाठी काही साड्या पाठविल्या होत्या. त्या तिला पसंत न पडल्याने त्या दिवसापासून तिने सर्वांशी अबोला धरला होता. दि. २५ जानेवारी रोजी वडील व मुलगी घरी होते. तिचे दोन भाऊ, वहिनी,आई व इतर लोक लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास तरुणीने कपडे बदलले व कोणाला काही न सांगता ती घरातून बाहेर पडली. (वार्ताहर)मुलगी लवकर घरी न आल्याने वडिलांनी तिचा शोध घेतला; परंतु ती कोठेच सापडली नाही. सायंकाळी ६.३० च्या सुमारास पत्नी, मुले, सून घरी आल्यानंतर त्यांनी ही बाब त्यांच्यासमोर कथन केली. तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, तिथेही ती नसल्याचे निदर्शनास आले.
साड्या न आवडल्याने वधूचे पलायन
By admin | Updated: January 31, 2015 22:53 IST