स्रेहा मोरे, मुंबईविधानसभा निवडणूक अवघ्या नऊ दिवसांवर आली असताना युती आणि आघाडीच्या फाटाफुटीमुळे बहुरंगी लढत होणार आहे. पाचही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने निवडणूक सोपी नाही, हे नक्की. त्या पार्श्वभूमीवर, राजकीय समीकरणे बदलल्यामुळे सर्वांचेच लक्ष ‘खुर्ची’कडे लागून राहिले आहे. मात्र या सत्तेसाठी यंदा राज्यभरात निवडणुकीच्या रिंगणात असलेले एकूण १६८६ अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार आहेत.निवडणुकीच्या तोंडावरच युती आणि आघाडीमध्ये ताटातूट झाली. प्रमुख पक्षांनी उमेदवार शोधण्यासाठी अगदी टोकाची खेचाखेची केली. याचाच परिणाम म्हणून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची बंडखोरीही वाढली. यामुळे आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि मनसे या प्रमुख पक्षांमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. मात्र, या सर्वच पक्षांना सत्तास्थापनेत अपक्ष उमेदवारांकडे ‘फिल्डिंग’ लावावी लागणार आहे. अपक्ष उमेदवारांचा हा दणका लक्षात घेता त्यांचे राजकीय महत्त्व दुर्लक्षित करून चालणार नाही. यंदाच्या निवडणुकीतही त्यांच्यामुळे सत्ताकारणाचा आलेख बदलेल असे मानले जाते आहे. राजकारण केवळ आकड्यांचा खेळ नसतो आणि मुख्य म्हणजे येथे दोन आणि दोन-चार नव्हे तर तीन किंवा पाचही होतात. त्यामुळे या निवडणुकीत हे अपक्ष उमेदवार कोणाचे पारडे जड करतात आणि कोणाकडे पाठ फिरवतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
फाटाफुटीमुळे अपक्ष ठरणार निर्णायक !
By admin | Updated: October 7, 2014 05:52 IST