नागपूर विद्यापीठ : ‘नॅक’च्या परीक्षेत प्रशासन उत्तीर्णनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी बुधवारचा दिवस अतिशय सुखद ठरला. ‘नॅक’च्या (नॅशनल असेसमेंट अॅन्ड अॅक्रेडिटेशन कौन्सिल) परीक्षेत विद्यापीठाने बाजी मारली असून ‘अ’ श्रेणी मिळविण्यात यश मिळविले आहे. नेहमी टीका झेलणाऱ्या विद्यापीठाने जागतिक स्तरावर भरारी घेण्यास आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. वर्षाखेरीस गोड बातमी मिळाल्यामुळे विद्यापीठात आनंदाचे वातावरण आहे. बंगळुरू येथील ‘नॅक’च्या मुख्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाला ३.८ ‘सीजीपीए’ मिळाले आहेत. २००९ साली ‘नॅक’ने विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी दिली होती.नागपूर विद्यापीठाची पाहणी करण्यासाठी कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ए. एम. पठाण यांच्या नेतृत्वातील ‘नॅक’ समितीने १० ते १३ सप्टेंबर दरम्यान विद्यापीठाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. विद्यापीठातील विविध पदव्युत्तर विभागातील प्रगतीचा आलेख, संशोधन कार्य, इत्यादीबाबत बारीकसारीक बाबींची चिकित्सा केली होती.‘नॅक’ समिती पाहणी करून गेल्यानंतर महिन्याभरात विद्यापीठाच्या दर्जाबाबत माहिती कळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, तीन महिने उलटूनही याबाबत ‘नॅक’कडून काहीही माहिती आली नसल्याने प्रशासनात चिंतेचे वातावरण होते. परंतु अखेर बुधवारी ही गोड बातमी प्रशासनाला कळाली.सपकाळ, अनुपकुमार ‘हिट’गेल्या ३ वर्षांमध्ये माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी विद्यापीठात सकारात्मक बदल घडवून आणले होते. विशेषत: संशोधन आणि दर्जावर त्यांचा जास्त भर होता. डॉ. विलास सपकाळ यांच्या राजीनाम्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरूपद सोपविण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्राचा कुठलाही अनुभव नसतानादेखील अनुपकुमार यांनी हे आवाहन स्वीकारले व यासाठी पुढाकार घेतला होता. कुठल्याही परिस्थितीत यंदा ‘अ’ श्रेणी मिळावी यासाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले होते. ‘नॅक’च्या मागील दौऱ्यात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळून सादरीकरणाचा ‘रोडमॅप’ तयार करण्यात आला. समितीसमोर विभागाचे जास्तीत जास्त चांगले सादरीकरण कसे होईल, समितीसमोर कसे बोलायचे इत्यादी मुद्यांवर विभागप्रमुखांना तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले होते. प्रत्येक विभागात ‘पॉवरपॉईन्ट’ सादरीकरण देण्यात आले होते. या यशामध्ये अनुपकुमार यांचा मोलाचा वाटा असल्याचे मत विद्यापीठ वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय तत्कालीन प्र-कुलगुरू डॉ.देशपांडे, कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.(प्रतिनिधी)हा अभिमानाचा क्षणविद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. कठीण काळात विद्यापीठाने हे यश मिळविले. याचे श्रेय माजी कुलगुरू डॉ. सपकाळ, अनुपकुमार यांना जाते. शिवाय प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी ‘नॅक’ समितीच्या दौऱ्यासाठी अहोरात्र मेहनत केली होती. विद्यापीठात झालेल्या चांगल्या कामांचे हे फळ आहे. विद्यापीठासाठीच नव्हे तर येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व नागपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.आता मिळेल अतिरिक्त अनुदान‘़नॅक’ची ‘अ’ श्रेणी मिळाल्यामुळे लोकांची विद्यापीठाकडे पाहण्याची दृष्टी तर बदलेलच शिवाय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अतिरिक्त अनुदान मिळेल. ‘अ’ श्रेणी मिळाल्यमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘पोटेंशिअल फॉर अॅलियन्स युनिव्हर्सिटी’ या योजनेवर दावा करू शकेल शिवाय ‘नाबार्ड’चे दरवाजे उघडतील. अनेक केंद्रीय संस्था विद्यापीठाला विकासासाठी अनुदान देऊ शकतील. यामुळे विद्यापीठात संशोधन कार्याला आणखी चालना मिळेल.
ब्राव्हो! ‘अ’ श्रेणी मिळाली
By admin | Updated: December 11, 2014 00:51 IST