नाशिक/पुणे : देशातील शैक्षणिक परिस्थिती आणि आरक्षणामुळे दुरावलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे ब्राह्मण मुलांचा परदेशाकडे ओढा असल्याचे मत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी येथे चित्तपावन ब्राह्मण संघातर्फे शुक्रवारी आयोजित परशुराम वेद पुरस्कार सोहळ््यात केल्याने वाद निर्माण झाला आहे. शनिवारी त्यांच्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटले. टिळक यांच्या निवासस्थानासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर शाखेने निदर्शने करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.शैक्षणिक परिस्थिती आणि आरक्षणामुळे दुरावलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे शिक्षणासाठी परदेशी गेलेले विद्यार्थी पुन्हा मायदेशी परतत नाही व त्यांच्या वृद्ध माता-पित्यांवर उतारवयात एकाकी जीवन जगण्याची वेळ येते. त्यामुळे परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या तसेच परदेशात जाण्याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मायदेशी परतण्याची इच्छाशक्ती निर्माण करण्याची गरज असल्याचेही टिळक यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात सांगितले. शनिवारी त्यांच्या वक्तव्यावर पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापौरांच्या केसरी वाडा येथील निवासस्थानासमोर आंदोलन झाले. भाजपाची आरक्षणाबाबतची भूमिका कायम दुटप्पी राहिलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मा. गो. वैद्य हे अनेकदा आरक्षणाच्या विरोधात बोलतात. महापौरही आता त्याच रांगेत आल्या आहेत, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.आरपीआय नाराजभाजपाबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) टिळक यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे व पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापौरांनी आपली भूमिका त्वरित मागे घेण्याची मागणी केली.‘आप’चे शहर पदाधिकारी मुकुंद किर्दत यांनीही महापौरांच्या भूमिकेवर जात्यंध व धर्मांध व्यक्ती दुसरे काय बोलणार, अशी प्रतिक्रिया दिली. (प्रतिनिधी)मूक मोर्चांमुळे ब्राह्मणही एकवटलेराज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या समाजाच्या मोर्चांमुळे ब्राह्मण समाजही एकवटला असून, त्यामुळे पुण्यात निवडणुकीला उमेदवारी करताना अनेक ब्राह्मण संघटनांनी मला समर्थन दर्शवित पुण्यात राजकीय परिवर्तन घडविल्याचे टिळक यांनी नाशिकमध्ये नमूद केले. ब्राह्मण संघटनांचीही अशाप्रकारचा मोर्चा काढण्याची तयारी होती. परंतु या समाजाची प्रगती बुद्धिमत्तेच्या जोरावर झाली असून, त्यामुळे आरक्षणासाठी मोर्चा काढायचा नाही, असा मतप्रवाह निर्माण झाल्याचे टिळक म्हणाल्या. वादानंतर टिळक यांचे घूमजावब्राह्मण समाज किंवा आरक्षण असे निवडक शब्द वेचून त्याचा विपर्यास करण्यात आला आहे. परदेशी गेलेल्या भारतीय युवकांना पुन्हा देशात आणण्यासाठी सामाजिक वातावरण पोषक असले पाहिजे. तसे ते गेल्या ६० वर्षात झाले नाही, असे मी म्हणाले. वैयक्तिक मी किंवा माझा पक्षही आरक्षणविरोधी नाही. - मुक्ता टिळक, महापौर, पुणे
आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांचा परदेशाकडे ओढा!
By admin | Updated: April 30, 2017 01:22 IST