राजगुरूनगर : खेड तालुक्यातील नायफडच्या धाबेवाडी गावाच्या हद्दीतील जंगलात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उलगडले असून सख्या पुतण्याने तिचा खून केला असल्याचे उघड झाले आहे. संबंधित महिला त्याच्याकडे प्रेमसंबंधांची एकतर्फी मागणी करीत असल्यामुळे खून केल्याचे उघडकीस आले आहे. नायफड गावाच्या धाबेवाडीजवळ एका महिलेचा मृतदेह ११ सप्टेंबर रोजी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्याची बातमी वर्तमानपत्रात आली. शिरूर पोलीस ठाण्यात ३ सप्टेंबर रोजी सुनीता शिवाजी जगदाळे (वय ३६, रा. गोलेगाव, करंदेमळा, शिरूर) ही महिला हरवल्याची तक्रार दाखल होती. या बातमीवरून शिरूर पोलिसांनी हरवलेल्या महिलेच्या नातेवाईकांना घेऊन खेड पोलीस ठाणे गाठले. मृतदेहाच्या वस्तू आणि वर्णन दाखविल्यानांतर मृत महिला सुनीता जगदाळे असल्याची खात्री तिच्या नातेवाईकांना पटली. त्यापुढे खेड पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासाअंती त्यांच्या पुतण्याचा संशय आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनाक्रम उलगडला आणि त्याने गुन्हा कबूल केला. त्यानुसार सुनीता जगदाळे यांना पहिल्या पतीने सोडून दिले होते. त्यानंतर त्यांचे शिवाजी जगदाळे यांच्याशी दुसरे लग्न झाले होते. शिवाजी जगदाळे यांचेही नंतर निधन झाले. पण सुनीता शिवाजी यांच्याच कुटुंबात सावत्र मुले, दीर आदींसोबत राहत होत्या. त्यांचा सख्खा पुतण्या सूरज विठ्ठल जगदाळे (वय २०) यांच्याकडे त्या एकतर्फी प्रेमसंबंधांची मागणी करीत होत्या. त्याला फोन आणि मेसेज करून त्या तशी मागणी करीत. मात्र, नातेसंबंधात असे वागणे मान्य नसल्याने तो प्रतिसाद देत नव्हता. म्हणून चारचौघात त्याचा वेगवेगळ्या कारणांवरून अपमान करायच्या आणि शिवीगाळ करायच्या. शेवटी त्याने त्यांचा काटा काढायचे ठरविले. त्यानुसार ३ सप्टेंबरला तो मिलिटरी भरतीला जात असल्याचे घरी सांगून आपल्या मोटारसायकलवर बाहेर पडला. तसेच सुनीता या दातांच्या डॉक्टरकडे जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या. प्रत्यक्षात दोघांनी भीमाशंकरला जायचे ठरविले. जातानाच त्याने आपल्या बॅगमध्ये सुरा लपविला होता. दोघेजण भीमाशंकरला निघाले. मंचर-भीमाशंकर रस्त्याने धाबेवाडीजवळ आल्यावर एका छोट्या रस्त्याने त्याने मोटारसायकल आत वळविली. मोटारसायकल थांबवून, तेथील झाडीत नैसर्गिक विधीला जातो असे सांगून जवळची बॅग घेऊन झाडीत गेला. त्याच्यामागोमाग सुनीता पर्स घेऊन गेल्या. जरा वेळ झाडीत बसू असे ठरले. बसल्यावर त्याने बॅगेतून सुरा काढला आणि त्यांच्या पोटात खुपसला. नंतर गळ्यावर आणि पाठीत वार केले. त्यानंतर तेथून मोटारसायकल घेऊन गोलेगावला परतला. अशी या प्रकरणाची पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी माहिती दिली. (वार्ताहर)
महिलेचा सख्ख्या पुतण्याने केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 01:49 IST